आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे \'व्हिजन\' : विकास करण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  -‘शहरांच्या विकासासाठी वित्त अायाेगाच्या शिफारशींनुसार राज्य सरकार महापालिकांना निधी देत असते. त्यामुळे या विकास निधीतून होणाऱ्या कामांचे श्रेय सरकारला मिळते. मात्र जर एखाद्या महापालिकेत वेगळ्या पक्षाची सत्ता असेल तर सरकारला श्रेय मिळू नये म्हणून अशा निधीमधून प्रकल्प राबविण्याचे टाळले जाते, परिणामी विकास खुंटताे. अशी श्रेयवादाची स्पर्धा टाळण्यासाठी संसद ते महापालिकांपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असावी, जेणेकरून विकासाला गती मिळेल,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी व्यक्त केले.   

महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महानगरांच्या विकासाचे आपले व्हिजन स्पष्ट करताना ते बाेलत हाेते. ‘आपले शहर, आपला अजेंडा’ या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी महानगरांच्या विकासासाठी सूचना मागवल्या आहेत. राज्यातील १० लाख लोकांनी सूचना दिल्या. चांगल्या सूचना देणाऱ्या निवडक लाेकांसमवेत मुख्यमंत्र्यांच्या संवादाचा कार्यक्रम भाजपतर्फे मुंबईत अायाेजित करण्यात अाला हाेता.   

मुख्यमंत्री म्हणाले, ‘नागरिकांना विशिष्ट सेवा  मुदतीत देण्याचे बंधन देणारा सेवा हमी कायदा सत्तेत येताच अाम्ही महाराष्ट्रात लागू केला. लाखो लोकांनी या सेवेचा लाभही घेतला आहे. अाता केवळ महापालिकांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा विशिष्ट कालावधीत देण्याचे बंधन टाकणारा मनपा सेवा हक्क कायदा अाम्ही अाणणार अाहाेत. तसेच महानगरात भूमिगत गटार याेजना व महिलांसाठी शौचालये बांधणे बंधनकारक करण्याची घाेषणाही त्यांनी केली.  
 
राज्यातील आौष्णिक केंद्रांना त्यांच्या परिसरातील सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोराडी औष्णिक केंद्रास नागपूर शहराचे सांडपाणी पुरवले जात असून त्याद्वारे १८ कोटींचे वार्षिक उत्पन्न नागपूर महापालिकेला मिळत आहे. औरंगाबादचे सांडपाणी डीएमआयसीला तर नांदेडचे पाणी परळी औष्णिक केंद्राला पुरवले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.  

राज्यभर वाय-फाय   
‘मुंबईत राज्य सरकार माेफत वाय-फाय सुविधा देते, तशीच राज्यभर का दिली जात नाही?’ या प्रश्नावर लवकरच राज्यभर अशी सेवा सुरू केली जाईल. मात्र केवळ सरकारी सेवांचा लाभ घेण्याासाठी ही मोफत असेल आणि खासगी कामासाठी वाय-फाय वापरले तर काही वेळेनंतर त्याचे पैसे आकारले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचेही चांगलेच चिमटे काढले. मुंबईतील रस्त्यांमधील भ्रष्टाचाराचा संदर्भ देत ते म्हणाले, नागपूर मनपात भाजप सत्तेत असताना बनवलेले काँक्रीट रस्ते २० वर्षांनंतरही मजबूत अाहेत. मुंबईत अशा रस्त्यांची गरज अाहे. शहर परिवहन यंत्रणेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सिटीबस कधी येईल व त्यात किती जागा मोकळ्या आहेत, याची कल्पना नागरिकांना मिळायला हवी’, हे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.  
 
जनता की भाजपचे कार्यकर्ते   
सामान्य माणूस म्हणून बोलावलेले हे निवडक लोक प्रश्न विचारताना मुख्यमंत्री आणि भाजपची तोंडभरून प्रशंसा करताना दिसले. अकोल्याहून आलेल्या एका व्यक्तीने तर भाजप अल्पसंख्य व दलितांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे सांगून अानंदही व्यक्त केला. इतकेच काय मुंबई मनपात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे जेव्हा मुुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले तेव्हा उपस्थित अनेकांनी टाळ्या वाजवून अानंद व्यक्त केला. त्यामुळे उपस्थित लाेक सामान्य जनता हाेती की भाजप समर्थक ? असा प्रश्न उपस्थित केला जात हाेता.
 
एकही महिला नाही  
शहरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातून बोलावण्यात आलेल्या सुमारे २० लोकांमध्ये एकही महिला नव्हती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनाही याबाबत  नाराजी लपवता आली नाही. महिला शौचालयांचा प्रश्न त्यांनाच उपस्थित करावा लागला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...