आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या मंत्र्यांच्‍या खासगी सचिवांसह सर्व अधिकारी मुख्यमंत्रीच निवडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना आखत असते, परंतु काही अधिकारी खाेडा घालत असल्याने या याेजना कागदावरच राहतात. सरकार काेणाचेही असाे, अाजवर असाच अनुभव येत असताे. मंत्र्यांच्या कामात त्यांच्या खासगी सचिवांचा मोठा ‘हात’ असतो. त्यांच्या कारभाराची झळ मात्र सरकारला साेसावी लागते. असे प्रकार टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली अाहे. नव्या मंत्र्यांच्या खासगी सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांत ते स्वत: लक्ष घालणार अाहेत. एवढेच नव्हे तर काही जुन्या मंत्र्यांकडील अधिकारीही बदलण्यात येणार असल्याचे समजते.
कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक योजना आखल्या. अभिनेता नाना पाटेकर यांना बांधकाम विभागासाठी ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्यापासून स्वस्त घरे, सरकारी गृह योजनांचे एकत्रीकरण, हाउसिंग पॉलिसी अशा याेजनांचा त्यात समावेश अाहे, परंतु यापैकी एकही योजना अस्तित्वात आली नाही. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गाइड छापणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी ‘कॉपीराइट कायदा’ प्रभावीपणे राबवता यावा यासाठी विधी व न्याय विभागाला अादेश देऊनही त्यावर अद्याप काम झालेले नाही. अशी अनेक उदाहरणे अाहेत, ज्यात अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे चांगल्या याेजना रखडल्याचा अनुभव येत अाहे. जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांमधील कामाशिवाय अन्य विभागांच्या कामांना फारशी प्रसिद्धी मिळत नसल्याने ही कामे जनतेपर्यंत जात नसल्याचीही काही मंत्र्यांची तक्रार अाहे. त्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगितले जाते.
नव्या मंत्र्यांचे सचिव व अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सूत्रांनी सांगितले, नुकतीच ११ मंत्र्यांनी शपथ घेतली असून अापापल्या खात्याचा पदभारही स्वीकारला अाहे. या मंत्र्यांकडे काम करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी लॉबिंगही केले आहे. काही मंत्र्यांनी तर स्वतःच्या मर्जीतील काही जणांची वर्णी लावण्यासही सुरुवात केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्व इच्छुकांची एक यादी तयार करण्यास सांगितले आहे. प्रत्येक विभागात चांगले काम करणारे खासगी सचिवासह अन्य अधिकारी असावेत, या उद्देशाने मुख्यमंत्री स्वत: ही यादी अंतिम करणार अाहेत. एवढेच नव्हे तर काही जुन्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांचीही बदली केली जाणार असून त्याठिकाणी नवीन अधिकारी नेमले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाद अाेढवण्याची शक्यता
केंद्रात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बहुतांश मंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप करून अापल्या पद्धतीने कारभार चालवण्यास भाग पाडले, अशी चर्चा असते. माेदींच्या या कारभारावर काही मंत्री नाराज असल्याचेही बाेलले जाते. अाता याच पार्श्वभूमीवर राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांचे खासगी सचिव व इतर अधिकारी ठरविणार असल्याने त्यावर वाद उद्भवण्याची शक्यता अाहे. मंत्रिमंडळातील काही सदस्यांत अाधीच वादाची ठिणगी पडलेली असताना फडणवीसांच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया उमटते, ते पाहणे महत्त्वाचे ठरू शकेल.
बातम्या आणखी आहेत...