आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा प्रमुख चेहरा मुख्यमंत्री फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अागामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपचा मुख्य चेहरा असतील ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महापौरपदापासून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत प्रवास करणाऱ्या फडणवीस यांनी नगर परिषदांच्या निवडणुकीतही महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि भाजप सरकारची दोन वर्षांतील राज्याची प्रगती लाेकांसमोर मांडली होती. फडणवीसांवर विश्वास ठेवून लोकांनी नगर परिषदांमध्ये भाजपच्या पदरात भरभरून दान टाकत पक्षाला एक नंबरचे स्थान दिले. हे स्थान टिकवण्यासाठी फडणवीसच पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने लोकांसमोर जाणार आहेत.    

ठाण्यात गुरुवारी झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या प्रगतीचा आलेख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर मांडला होता. दुष्काळाचे वातावरण व रिकामी तिजाेरी अशा बिकट परिस्थितीत सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतरही सरकारने आव्हानांचे संधीत रूपांंतर केले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून  दुष्काळमुक्त केलेली ४ हजार गावे, १२ तास वीज, कृषी पंपांचे वितरण, सोलार फीडर, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश, वसतिगृहात जागा नसेल तर मुलांना राहण्यासाठी दिला जाणारा खर्च, ३ लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण अशा सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत घेऊन जा, असे आवाहनही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले होते. आगामी निवडणुकांच्या प्रचारात आता हेच विकासाचे माॅडेल मुख्यमंत्री फडणवीस  लाेकांपुढे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
प्रचारात पारदर्शक कारभार हाच मुख्य मुद्दा  
स्वच्छ प्रतिमा आणि तरुणांना आकर्षित करणारा फडणवीसांचा चेहरा आहे. देशात दुसऱ्यांदा सगळ्यात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला होता. तसेच वयाच्या २७ व्या वर्षीच नागपूर महापालिकेतील सगळ्यात तरुण महापौर म्हणून त्यांनी नेतृत्व केले होते. राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर सुरुवातीपासून पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरणारे फडणवीसही आपल्या मित्रपक्ष शिवसेनेकडूनही तशाच कारभाराची अपेक्षा करत आहेत. निवडणुकांच्या प्रचारात पारदर्शक कारभार हा फडणवीसांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे.