आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी मुख्यमंत्री बाेलताेय : राष्ट्रीय मूल्ये असणारी पिढी शिक्षणातून घडवायचीय!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील अनेक देश वार्धक्याकडे झुकत असतानाच २०२० मध्ये भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे जगातील सर्व अर्थव्यवस्थांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता भारत पूर्ण करू शकणार आहे. तरुणाईच्या ताकदीने भारताचे भवितव्य बलशाली  आहे. तसेच शिक्षणातूनही राष्ट्रीय मूल्ये असणारी पिढी आपल्याला घडवायची आहे,
असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात केले.    
 
शैक्षणिक आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा, ॲप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी अशा विविध विषयांवर युवा पिढीशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री बोलत होते.  फडणवीस म्हणाले, २०२० मध्ये जपानचे वय ४८ वर्षे, पूर्व युरोपचे ४४,  पश्चिम युरोप ४१, चीनचे ३९, अमेरिका ३७ असेल त्या वेळी भारताचे वय २९ वर्षे असणार आहे. त्यामुळे भारताकडे तरुणाईची मोठी ताकद असणार आहे.  हेच ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि डिजिटल इंडियासारखे उपक्रम हाती घेतले आहेत.  शिक्षण घेताना आणि शिकल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात राष्ट्रीयता-सामाजिकतेचा भाव जपला पाहिजे. कारण शिक्षणातून आपल्याला स्वार्थी लोक तयार करायचे नाहीत तर या शिक्षणातून राष्ट्रीय मूल्य असलेली पिढी घडवायची आहे. आपल्या समाजाकरिता, देशाकरिता काही तरी करण्याची इच्छा अाहे.
 
 समाजामध्ये व्यवस्था उभ्या राहिल्या म्हणून अापल्याला शिक्षण मिळत आहे. समाजाने तयार केलेल्या व्यवस्थेमधून जर आपल्याला शिक्षण  मिळत असेल तर  आपल्या जीवनात त्याची परतफेड करण्याचादेखील विचार असला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.    
 
शिक्षण क्षेत्राचा पाच वर्षांनी आढावा : शहराचा विकास आराखडा दर दहा वर्षांनी करण्यात येतो, त्याच धर्तीवर बदलत्या परिस्थितीनुसार आणि शिक्षण क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत अभ्यासक्रमाचा दर पाच वर्षांनी आढावा घेणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कंपन्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.  विद्यापीठांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम आणि उद्योगधंद्यांची आवश्यकता यात समन्वय असणे आवश्यक आहे. कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना आपला कल कोणत्या शाखेकडे आहे, आपण कोणते करिअर निवडले पाहिजे हे समजण्यास सोपे होते. कलमापन चाचणीमुळे योग्य ते करिअर निवडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना मिळणार असून आगामी काळात कलमापन चाचणी अधिकाधिक आधुनिक केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.   
 
अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचा   : विद्यार्थ्यांचे खेळातही चांगले करिअर होऊ शकते. महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडवण्यासाठी राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्वांसाठी शिक्षण या कायद्यानुसार शाळांना मैदान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात आहे. त्याअनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना थेट नियुक्तीही दिली जाते, असेही फडणवीस म्हणाले.
 
अाठ लाख तरुणांना विशेष कौशल्य प्रशिक्षण    
महाराष्ट्रात सर्वाधिक ॲप्रेंटिस आहेत.  महाराष्ट्रात पहिल्या वर्षी ६९ हजार तर गेल्या वर्षी एक लाख ॲप्रेंटिस होते. आता ही संख्या वाढतच जाणार आहे. उद्योगांशी झालेल्या विविध २४ सामंजस्य करारांनुसार आतापर्यंत ८ लाख तरुणांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ३ लाख शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेती आणि शेतीपूरक उद्योगातील प्रशिक्षण देण्यासंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...