आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीची गुन्हेगारी राेखणार मुंबईचे पाेलिस, मुख्यमंत्र्यांच्या अादेशाने 40 जणांची फाैज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई  - मुख्यमंत्र्यांचे “होमटाऊन’ असलेल्या नागपुरात वाढत चाललेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणाला आता मुंबई पोलिस दलातील अनुभवी आणि हुशार पोलिस अधिकारी आळा घालणार आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून या आदेशात मुंबईतून नागपूरला बदली झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पोलिस महासंचालकांना मुंबई पोलिसांतील अनुभवी अधिकाऱ्यांना नागपूरला पाठवण्याचे आदेश दिले होते.    

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या सन २०१५ च्या गुन्हे नोंद अहवालानुसार, नागपूर शहरात दर एक लाख लोकांमागे ४०७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत खूपच अधिक असून त्याखालोखाल मुंबईत दर एक लाख लोकसंख्येमागे ३४० गुन्हे नोंदवण्यात आले होते. तर याच अहवालानुसार बलात्कार आणि विनयभंग यांसारख्या महिलांशी निगडित गुन्ह्यांच्या प्रमाणातही नागपूर हे देशातील पाचव्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. सन २०१५ मध्ये नागपूरमध्ये १६६ बलात्कार, तर  महिलांवर हल्ल्याच्या ३९२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मध्यंतरी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून गंभीर गुन्ह्यांमधील कैदी फरार होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. या मुद्द्याचे भांडवल करून विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच खुद्द गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शहरातच महिला आणि नागरिक सुरक्षित नसतील तर इतर शहरातील नागरिकांची काय कथा, अशा शब्दांत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. 
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिस दलातील तब्बल ४० हुशार आणि अनुभवी अधिकाऱ्यांची नागपूर आणि गडचिरोली परिक्षेत्रात रवानगी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशच पोलिस महासंचालकांना दिले होते, अशी माहिती पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 
 
गडचिराेलीतही ‘मेरिट’चाच निकष  
आतापर्यंत पोलिस नियुक्त्यांच्या धोरणानुसार नागपूर आणि गडचिरोली परिक्षेत्रात असलेले नक्षलवाद्यांचे आव्हान लक्षात घेता पोलिस प्रशिक्षण केंद्रातून आलेल्या नवख्या अधिकाऱ्यांना तिकडे पाठवले जात असे. मात्र, वय वर्षे ३० पेक्षाही कमी असलेल्या या नवख्या अधिकाऱ्यांना पुरेसा अनुभव नसल्याने गुन्हेगारी रोखण्यात हे अधिकारी कमी पडत असल्याचे दिसून आले होते. ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिस दलातील अनुभवी अशा अधिकाऱ्यांना नागपूर आणि गडचिरोली परिक्षेत्रात पाठवण्याचे निर्देश महासंचालकांना दिले होते.
 
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीच्या २००८ सालच्या पोलिस उपनिरीक्षक तुकडीतील ४० अधिकाऱ्यांना नागपूर आणि गडचिरोली परिक्षेत्रात पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या विविध चाचण्यांमध्ये मेरिटमध्ये आले होते. २०११ मध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांच्या मुंबईत नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतही या अधिकाऱ्यांची कामगिरी लक्षणीय होती.