आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणंदमुक्त शहरांसाठी सरकारी अधिकारी सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र व राज्य सरकार जनतेसाठी अनेक योजना आखते; परंतु या योजना जनतेपर्यंत योग्यरीत्या पोहोचत नाहीत. याला कारण सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता सरकारी अधिकारीही जनतेप्रति आपले काही देणे असल्याचे मान्य करत सेवा करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या (नागरी) अंमलबजावणीसाठी २१ सरकारी अधिकाऱ्यांनी नगरपालिका दत्तक घेऊन काम करण्यास तयारी दर्शवल्याची माहिती नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

म्हैसकर म्हणाल्या, गावे पाणंदमुक्त (हागणदारीमुक्त) करण्यासाठी राज्य सरकार सरसावले असतानाच आता नागरी भागही पाणंदमुक्त करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची (नागरी) अंमलबजावणी राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शहरे २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करून २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत शहरातील घनकचरा १०० टक्के गोळा करणे, त्याची वाहतूक करणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट नगरविकास विभागाने ठरवलेले आहे. याची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने काही शहरे दत्तक घ्यावीत, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार २१ अधिकाऱ्यांनी अशी शहरे दत्तक घेतली असून हे अधिकारी संबंधित शहरांना भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष देणार आहेत.

-२१ अधिकाऱ्यांनी घेतल्या राज्यातील नगरपालिका दत्तक
-२ ऑक्टोबर २०१७ पर्यंत सर्व शहरे होणार हागणदारीमुक्त
-तीन वर्षांत शहरे शंभर टक्के घनकचरामुक्त करण्याचे राज्य सरकारचे ध्येय

प्रतिष्ठित नागरिकांची समिती
महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, मलकापूर (नपा), पन्हाळा, मलकापूर (कोल्हापूर), वेंगुर्ला, खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड, रोहा, माथेरान, भगूर, मोवाड, कुर्डुवाडी, करमाळा आणि मुंबई शहरातील बी व सी वॉर्डाची पाणंदमुक्त नगरपालिकांसाठी निवड करण्यात आलेली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांसोबत काही प्रतिष्ठित नागरिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती या सर्व योजनेवर लक्ष ठेवून सल्ला देण्याचेही काम करेल. तसेच समाजातील एखाद्या व्यक्तीला अशी नगरपालिका दत्तक घ्यायची असेल तर त्याचेही स्वागत असेल, असेही मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांचे नाव व दत्तक नगर परिषद
-सुधाकर ज्ञा. बोबडे (अवर सचिव)- जालना नगर परिषद व सातारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा (म्हसवड वगळून)
-अजित कवडे (अवर सचिव)- मंगळवेढा
-स. शि. खरात (अवर सचिव)- पाथर्डी, जि. अहमदनगर
-उदय सार्दळ (कक्ष अधिकारी)- देवळाली-प्रवरा
-राजीव आंबीकर (कक्ष अधिकारी)- तिरोरा, जि . गोंदिया
{शशिकांत योगे (कक्ष अधिकारी)- तुळजापूर, बार्शी,
-सुनील धोंडे (कक्ष अधिकारी)- श्रीगोंदा
-संजय जगताप (सहायक)- बीड
-विजय वक्ते (सहायक)- फैजपूर, जि. जळगाव
-राजू अंबाडेकर (सहायक)- चांदूर रेल्वे व मोर्शी, जि. अमरावती