आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काँग्रेसचा प्रचार नाही केला तरी चालेल पण अपप्रचार करू नका’(महाकौल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेच्या प्रचारात सहभागी झाला नाहीत तरी चालेल. मात्र, किमान अपप्रचारात तरी सामील होऊ नका, अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना सुनावले. रविवारी मुंबईतील मालवणी येथील प्रचारसभेत काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करत पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र, या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, गुरुदास कामत, नसीम खान आणि कृपाशंकर सिंह यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसमधल्या दुहीचे पुन्हा दर्शन झाले.    

मतदानाला अवघे सोळा दिवस उरले असताना काँग्रेसने मालवणी येथील प्रचारसभेत जाहीरनामा प्रकाशित केला. मात्र, तिकीट वाटपात आपल्या समर्थकांना डावलल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या सभेपासून दूरच राहिले. व्यासपीठावर फक्त मोहन प्रकाश, माजी खासदार प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, तसेच आमदार असलम शेख आणि अमीन पटेल आदी नेते उपस्थित होते. 

निरूपम म्हणाले,   शिवसेना आणि भाजप हे अाता वेगवेगळे लढत आहेत. मात्र,  निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत या दोघांनी फक्त महापालिकेतून पैसा कमावला, रस्त्याच्या कंत्राटातून कायम पैसा मिळत राहावा, म्हणून जाणीवपूर्वक रस्त्यांची दुरवस्था केली. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाच्या घोषणांचा उल्लेख केला. माजी खासदार मिलिंद देवरा व प्रिया दत्त यांनी  काँग्रेसमध्ये कोणतीही दुही नसल्याचे सांगत विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. 
 
काँग्रेसचा जाहीरनामा
{प्रत्येकाला बाराशे रुपयांत नळ जाेडणी.   
{‘मनपा थाळी’द्वारे स्वस्त दरात जेवण.   
{ प्रत्येकाला मोफत पाणी, टँकरमुक्त मुंबई.   
{ पुढील सात वर्षांत संपूर्ण मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उत्तम रस्त्यांसाठी ‘रोड डॉक्टर युनिट’ची स्थापना करणार.   
{ डम्पिंग ग्राउंड मुंबईबाहेर घालवणार.   
{ ‘डॉक्टर तुमच्या दारी‘द्वारे आरोग्यसेवा.    
{ फेरीवाला धोरण कायद्याचा प्रभावी अंमल.