आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतोदांनी दिलेली नावे गटनेत्याला माहिती नाहीत, काँग्रेसमधील गलथान कारभार चव्हाट्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या गौरवाच्या प्रस्तावावर कोणी बोलावे याबद्दल काँग्रेसचे प्रतोद आणि गटनेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचा प्रकार गुरुवारी विधान परिषदेत दिसून आला. त्यानिमित्ताने सभागृहातील काँग्रेस पक्षातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला. 

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी  गुरुवारी सकाळी गौरव प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे अनंत गाडगीळ, शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि काँग्रेसचे भाई जगताप यांची भाषणे झाली. त्यानंतर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वेळेची मर्यादा लक्षात घेता प्रत्येकाने थोडक्यात बोलावे, असे आवाहन केले. त्याला काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेतला. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्वच इतके मोठे आहे की, संपूर्ण दिवस त्यावर चर्चा केली तर ती कमी पडेल. त्यामुळे या प्रस्तावावर वेळेचे बंधन असू नये, असे ते म्हणाले. त्यावर माणिकरावांनी आपल्याकडे काही नावे आली आहेत, असे सांगितले. रणपिसे यांनी आपणच काही नावे दिल्याचे सांगितले. तेव्हा माणिकराव ठाकरे यांनी प्रतोदांनीही आपल्याकडे काही नावे पाठवली असल्याची बाब निदर्शनास आणून िदली.   

आपण बोलणारच : चांदूरकर   
प्रतोदांनी आपल्याला कोणती नावे पाठवली ते आपल्याला ठाऊक नाही, असे रणपिसे यांनी  सांगितले. त्यातच काँग्रेसचे जनार्दन चांदूरकर यांनी हे काय चालले, असा जाहीर सवाल उपस्थित केला. कोणी आपले नाव दिले किंवा नाही दिले तरी आपण या प्रस्तावावर बोलणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.  उपसभापती ठाकरे यांनी गटनेते व प्रतोदांनी दिलेली यादी वाचली आणि विषयावर पडदा टाकला. परिषदेत संजय दत्त हे  काँग्रेसचे प्रतोद आहेत, तर शरद रणपिसे हे गटनेते आहेत. मात्र, एकाच पक्षाच्या आणि सभागृहात शेजारी बसणाऱ्या नेत्यांमध्ये पक्षाच्या महनीय नेत्याच्या गौरवाबाबत  माहिती नसल्याने काँग्रेसचा गलथानपणा समोर आला.
बातम्या आणखी आहेत...