आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हात देण्याचे काँग्रेसचे संकेत, भाजपबरोबरची सत्ता सोडण्याची घातली अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू कौल मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी  अपक्ष म्हणून निवडून आलेले तीन बंडखोर शुक्रवारी स्वगृही परतल्याने  स्वबळावर सत्ता स्थापण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना थोडेसे बळ मिळाले आहे. शिवसेनेची सदस्य संख्या आता ८७ झाली आहे.  
 
बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. भाजपही स्वबळाच्या शक्यता पडताळून पाहत असल्याने  युतीचे पत्ते दोघांनीही गुलदस्त्यात ठेवले असतानाच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसही पुढे सरसावली असून राज्याच्या सत्तेतून शिवसेना बाहेर पडल्यास  मुंबई महापालिकेत पाठिंब्याचे संकेत काँग्रेसने दिले.
 
स्नेहल मोरे (विक्रोळी), तुळशीराम शिंदे (दिंडोशी) यांनी शुक्रवारी मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला तर अंधेरीचे नगरसेवक चंगेझ मुलतानी यांनी शिवसेनेला पाठिंबा देत भगवा गळ्यात घातला.  या पार्श्वभूमीवर आणखी काही नगरसेवक घेऊन सत्ता स्थापन करण्याची रणनीति शिवसेना आखत असून यासाठी शनिवारी सायंकाळी सेनाभवन येथे बैठकही बोलावली आहे.
 
 
 शिवसेना नेत्यांनी भाजपला सोबत न घेता मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करावी, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. उद्धव ठाकरेही युती न करता सत्ता कशी स्थापन करता येईल याबाबत विचार करत आहेत. काँग्रेस वगळून अन्य सर्वांना सोबत घेऊन मॅजिक फिगरच्या जवळ जाता येईल का, याची चाचपणी सुरू करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
 
मनसेचाही पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
भाजपशी युती न करता मनसेच्या सात नगरसेवकांबरोबरच काही अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना नेते प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती देऊन सूत्रांनी सांगितले, सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी शनिवारी सेनाभवन येथे एक बैठक बोलावली आहे.या वेळी उद्धव ठाकरे सर्व नगरसेवक आणि नेत्यांशी बोलून  सर्व शक्यता पडताळल्यावर सोमवारी सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय घेतील.
 
आधी तुमचे ठरवा, मग आम्ही ठरवू : शिवसेना-भाजप राज्याच्या सत्तेत अाहेत. अाम्ही थर्ड पार्टी अाहोत.  भाजपसोबत सत्तेत राहायचे की बाहेर पडायचे हे आधी शिवसेनेने ठरवावे. ते बाहेर पडल्यास आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नव्या समीकरणाचे संकेत दिले आहेत.
 
शिवसेना आमची शत्रू नाही
- शिवसेना अामची शत्रू नाही. राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू नसताे. मुंबईत  पाठिंब्याबाबत  पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवर प्रदेशाध्यक्ष ठरवतील. - नारायण राणे, काँग्रेस नेते
 
एकत्र यावे लागेल
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप या दाेन्हींची भूमिका सारखीच अाहे. निवडणुकीच्या काळात झालेले मतभेद  विसरून दोघांना एकत्र यावे लागेल.
- नितीन गडकरी, भाजप नेते, केंद्रीय मंत्री
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...