आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला युतीचे भाजपकडून संकेत, 10 वाजेपासून मतमोजणी, 11 वाजेपासून निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी गुरूवारी होणार आहे.  गुरूवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल आणि सकाळी ११ वाजेपासून निकाल हाती येऊ लागतील. दुपारी ३ वाजेपर्यंत एकंदरीत चित्र स्पष्ट होईल.  
 
 निवडणूक प्रचाराच्या काळात शिवसेनेला  औकात दाखवून देण्याची भाषा करणाऱ्या भाजपने स्वबळावर जिंकण्याची शक्यता दिसत नसल्याचे पाहून मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेशी युतीचे संकेत दिले आहेत. मात्र मुंबईतील मतदानानंतर वाढलेला मतदानाचा टक्का आणि शाखांचे गणित मांडत ११० जागा पदरात पडण्याचा शिवसेनेचा अंदाज असल्यामुळे त्यांनी या दिशेने कोणतेच संकेत दिले नाहीत.
 
या निवडणुकीत भाजप- शिवसेनेत प्रचंड कडवटपणा पाहायला मिळाला असला तरी  बुधवारी सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेशी वैचारिक मतभेद नसल्याचे सूतोवाच करत पुन्हा युतीचा मार्ग खुला असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र मुंबई महापालिकेत ११० जागा जिंकण्याचा अंदाज बांधत शिवसेनेने मुंबई स्वबळावर जिंकणर असल्याचे ठासून सांगत भाजपशी पुन्हा युतीबाबत कुठलेच संकेत दिले नाहीत.
 
या निवडणुका २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सेमी फायनल समजण्यात येत असल्यामुळे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस सरकारमध्ये उलथापालथ होण्याचा अंदाज असल्यामुळे या निवडणूक निकालांना महत्व प्राप्त झाले आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर  वेगवान राजकीय घडामोडी होतील. पहिल्या टप्प्यातही १५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्यांसाठी ६९ टक्के मतदान झाले होते.  दुसऱ्या टप्प्यात १० महानगरपालिकांसाठी मंगळवारी ५६.३० टक्के तर ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात ६९.४३ टक्के मतदान झाले होते.

मुंबईत एक्झिट पोलचा शिवसेनेला कौल भाजपला अमान्य :
एक्झिट पाेलच्या अंदाजानुसार, राज्यातील सर्वच महापालिकात भाजपची घाेडदाैड कायम राहील, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये भाजपचीच सत्ता येईल, असे भाकीत वर्तवले अाहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते मात्र या अंदाजाशी सहमत नाहीत. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अामदार अाशिष शेलार यांना मात्र अजूनही भाजपच स्वबळावर मुंबईत सत्ता मिळवेल, असा विश्वास वाटताे.
 
 देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी
ही निवडणूक भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ठरली आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी  या दोघांपैकी कोणाच्या नेतृत्वावर जास्त विश्वास व्यक्त केला हे गुरूवारच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
प्रचारादरम्यान अाराेप- प्रत्याराेपांची यथेच्छ चिखलफेक केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बुधवारी सायंकाळी अचानक ‘माताेश्री’वर दाखल झाल्याने राजकीय चर्चेला उधाण अाले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुलाच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी दानवे गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
लग्नाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने दानवे ‘मातोश्री’वर
भाजपच ठरेल राज्यात नंबर वन : दानवे
नगरपालिकांच्या निकालांप्रमाणे या निवडणुकांतही भाजपच राज्यात नंबर वन पक्ष बनेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला अाहे. तर शिवसेनेच्या वतीने निकालाबाबत अधिकृत भाष्य करण्यास काेणीही समाेर अाले नाही.
 
मुंबईत ११० जागांचे असे अाहे शिवसेनेचे गणित
मुंबईतील मतदान टक्केवारीचा अभ्यास करून शिवसेनेने तयार केलेल्या अंतर्गत अहवालात ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुमतासाठी चारच जागांची गरज भासणार असल्याने युतीची गरजच नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
सगळा फोकस मुंबई, शिवसेना-भाजपवरच
निवडणूक १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांची असली तरी सगळा फोकस मात्र मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना व भाजपवरच राहिला आहे. मुंबईचा निकाल राज्याच्या राजकारणाची भावी दिशाही ठरवणारा असेल.
 
वाढीव मतदानाच्या लाभावर सर्वांचाच दावा
२०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा १० टक्के जास्त मतदान झाले. या वाढीव मतदानाचा फायदा आपणालाच मिळेल, असा दावा भाजप, शिवसेनेसह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसही करत आहे. वाढीव मतदानाचा कौल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातो, असा आजवरचा अनुभव आहे.
 
यांचा निकाल
१० मनपा मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंप्री- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती आणि नागपूर
मराठवाडा : ८ जिल्हा परिषद निवडणूक झालेल्या २५ जिल्हा परिषदांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्हा परिषदा. 
 
मोबाइलवरही कळेल निकाल 
ट्रु व्होटर अॅपवर मनपा मतमोजणीची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. लोकांना सर्व टप्प्यांचे निकाल मिळावेत म्हणून निवडणूक आयोगाने हा अॅप तयार केला आहे.
राहा अपडेट- महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल, घडामोडी, लाइव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी... भेट द्या divyamarathi.com ला

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...