आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळकेंच्या भूमीत चित्रनगरी अव्यवहार्य; सांस्कृतिक खात्याकडे अहवाल : विनोद तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या नऊ वर्षांपासून रेंगाळलेला दादासाहेब फाळके चित्रनगरीचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि भाजपचे अपूर्व हिरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
 
७ ऑगस्ट २००९ रोजी नाशिक विकास कार्यक्रमाअंतर्गत या चित्रपटसृष्टीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्यानुसार ५ नोव्हेंबर २००९ रोजी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळास सादर केला होता. मात्र, या चित्रनगरीचा फिजिबिलिटी रिपोर्ट अनुकूल आला नसल्याने तो बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती तावडे यांनी दिली.   
 
भारतीय चित्रपटसृष्टीचे महर्षी दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी असलेल्या तसेच नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावमध्ये फाळकेंच्या नावाने चित्रपटसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार नाशिक विकास कार्यक्रमात त्याची तरतूद करून सांस्कृतिक विकास महामंडळास पाठवण्यात आला. मात्र, त्याबाबत पुढे काहीच प्रगती झाली नाही. राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांनी याबाबत गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असता, ‘चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास महसूल व वन विभागास विनंती करण्यात आली असून त्या विभागाकडून जमीन हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव तपासण्यात येत आहे,’ असे लेखी उत्तर देण्यात आले होते. यावर जाधव यांनी आक्षेप घेऊन, गेल्या दोन वर्षांपासून हेच उत्तर मिळत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आणि चित्रनगरीच्या या प्रस्तावाबाबत आजची नेमकी स्थिती काय आहे, याची विचारणा केली.  दरम्यान, नाशिकमधील लोकप्रतिनिधी जाधव, हिरे आणि हेमंत टकले या तिन्ही सदस्यांनी यावर आक्षेप घेतल्यावर, नाशिकमधील दोन्ही सदनांतील सर्व सदस्यांची याबाबत लवकरच बैठक घेऊन फिजिबिलिटी रिपोर्टचा पुनर्विचार करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले.  
 
दादासाहेब फाळकेंचा इतिहास अन‌् विनाेेद तावडेंचे अज्ञान  
फाळके नाशिकमध्ये जन्मलेले असले तरी त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग मुंबईला झाल्याचे निवेदन तावडे यांनी केले. त्यावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी हस्तक्षेप करीत, फाळकेंच्या बहुतांश चित्रपटांचे शूटिंग नाशिकमधील निसर्गरम्य परिसरात झाल्याचे सांगून, कुसुमाग्रजांसारख्या दिग्गजांनी त्यात अभिनयही केल्याची माहिती दिली. मात्र, फाळकेंच्या कार्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निवेदनाने अज्ञान उघड झाले. तसेच, चित्रनगरीचा प्रकल्प व्यवहार्यच नसल्याचे सांगणे यातून राज्य सरकारची याबाबतची लपवाछपवीही सभागृहात उघड झाली.
बातम्या आणखी आहेत...