आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. दाभोलकर, पानसरेंच्या हत्येशी संबंधितांची नार्को टेस्ट करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डॉ.दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या म्हणजे दहशतवादी हल्ला असून या हत्यांशी संबंधित अटक केलेल्या आरोपींवर देशद्रोहाचे खटले दाखल करून त्यांची त्वरित नार्को टेस्ट करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. हे आरोपी ज्या संघटनेचे आहेत त्या सनातनसारख्या संघटनेवरही बंदी घालावी. तसेच या संस्थेच्या सर्व बँक खात्यांचीही चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

दाभाेलकर यांच्या हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडे तर पानसरे यांच्या हत्या प्रकरणात समीर गायकवाड या दाेघांना संशयावरून अटक करण्यात अाली असून हे दाेघेही सनातनचे साधक अाहेत. डाॅ. भानुसे यांचा राेख या दाेघांवरच हाेता.

पत्रकार परिषदेत डॉ. भानुसे यांनी सनातन संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. या संस्थेची विविध बँकांमध्ये ११९ खाती असून त्यात कोट्यवधी रुपये जमा होत आहेत. यापूर्वीही ही संस्था अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे दिसून आले असून दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्येशी संबंधित लोकही याच संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेच्या शेकडो बँक खात्यात देणगी रूपाने पैसे जमा करणाऱ्यांचीही चौकशी होण्याची गरज डॉ. भानुसे यांनी या वेळी व्यक्त केली. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकार या संघटनांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. येत्या आणि जुलै रोजी सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून त्या बैठकीत याबाबतची विस्तृत चर्चा होऊन या मुद्द्यावरील आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

वेतन आयोगापूर्वी द्या शेतमालाला हमी भाव
केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याची प्रक्रिया राबवत आहे. त्याला विरोध नाही. मात्र, जेवढ्या तातडीने हा निर्णय घेण्यात आला तेवढ्याच आस्थेने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींकडेही सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ. भानुसे यांनी केली. या आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...