आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर भवन चळवळीचे केंद्र नव्हे, तर गुंडांचा अड्डा, माहिती आयुक्तांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ- डॉ. आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुंबईत काढण्यात अालेल्या माेर्चादरम्यान रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरात दंडेलशाही करून दुकाने बंद केली तसेच गाड्यांची ताेडफाेडही केली. छाया : संदीप महाकाल )

मुंबई- ‘दादरच्या आंबेडकर भवनावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकाश, भीमराव आणि आनंदराज या तिघा नातवांनी कब्जा केला होता. आंबेडकर बंधूंना दादरचा प्लाॅट हडप करायचा होता. आंबेडकर भवन आता चळवळीचे केंद्र राहिले नव्हते, तो गुंडांचा अड्डा झाला होता. बाबासाहेबांच्या स्वप्नातील चळवळीचे मध्यवर्ती ठिकाण उभारण्यासाठी भवन पाडणे आवश्यकच होते,’ असा खळबळजनक अाराेप पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार आणि राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

बाबासाहेबांनी १९४५ मध्ये हा भूखंड चळवळीच्या केंद्रासाठी खरेदी केला होता. नायगावमध्ये दंगल झाल्याने तेथील बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस दादरला आणण्यात आली. मात्र, दादरचा भूखंड बाबासाहेबांनी प्रेससाठी खरेदी केला नव्हता. उलट बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब यांनी या भूखंडावर बेकायदा भाडेकरू वसवले. त्याविरोधात बाबासाहेबांना कोर्टात धाव घ्यावी लागली होती, अशी माहिती देत आंबेडकर भवनावर हक्क सांगून भैय्यासाहेब या आपल्या बापाचा तोच वारसा त्यांची तिन्ही मुले चालवत असल्याची टीका गायकवाड यांनी केली.

‘आम्ही भवन गुपचूप पाडले नाही. त्याबाबत वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. महापालिकेने भवनाची इमारत धोकादायक होती. ते पाडणे ट्रस्टींचे कर्तव्य होते. मात्र, ती पाडण्यास आंबेडकर बंधूंचा विरोध होता. तिघांनीही तेथे बेकायदा कार्यालये थाटली होती. तिघा बंधूंनी आजपर्यंत एक रुपयासुद्धा भाडे दिलेले नाही, मग ते भाडेकरू कसे,’ असा सवाल गायकवाड यांनी केला. तसेच आंबेडकर बंधूंना दादरचा भूखंड हडप करायचा होता, असा पोलिसांनी दिलेला अहवालच त्यांनी पत्रकारांना दिला.

या आंबेडकर बंधूंना केवळ पैसा पाहिजे. पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टीने अनेकदा याप्रकरणी तोडग्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकाश आंबेडकर यांना ट्रस्टीचे अध्यक्षपद हवे आहे, तर इतर दोघा बंधूंना नव्या इमारतीत एकएक मजला. त्याला ट्रस्टींनी नकार दिला. तसेच ट्रस्टींमध्ये आंबेडकर कुटुंबीयांना घेऊ नये हे बाबासाहेबांचे धाेरण आम्ही पुढे चालवत आहोत. बाबासाहेबांनी खरेदी केलेल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचे भवनाचे पाडकाम करताना नुकसान झाले, असे भासवून आंबेडकर बंधू समाजाला फसवत आहेत. त्यांना या प्रेसची काळजी होती, तर मग ती धोकादायक इमारतीत का ठेवली? राजगृहमध्ये का नेली नाही, असा सवाल गायकवाड यांनी विचारला.

विराेध नकाे : अाठवले
पीपल्सइम्प्रूव्ह ट्रस्टद्वारे दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी १७ मजली आंबेडकर भवनची वास्तू समाजाच्या उत्थानासाठी निर्माण होत अाहे. चांगल्या कामाला कुणी विरोध करू नये, असे अावाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास अाठवले यांनी केले. तिन्ही आंबेडकर बंधूंना नव्या इमारतीमध्ये सध्या असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा देऊन वाद मिटवावा, असेही ते म्हणाले.

‘उद्या घटनेवरही हक्क सांगतील’
तिघेआंबेडकर बंधू बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रत्येक संस्थेवर हल्ली हक्क सांगत आहेत. उद्या हे तिघे बंधू उद्या ‘आमच्या आजोबांनी देशाची राज्यघटना लिहिली आहे म्हणून राज्यघटनेवरसुद्धा हक्क सांगतील,’ अशा शब्दांत रत्नाकर गायकवाड यांनी तिन्ही बंधूंची खिल्ली उडवली.
बातम्या आणखी आहेत...