आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत स्वबळावर आणल्या 84 जागा,आता सत्ता मिळवण्यात अडले घोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - भाजपबरोबर युती करण्याच्या आशेवर झुलून न राहाता मुंबई महानगरपालिकांसाठी शिवसेनेने स्वबळावर जाण्याचे ठरवले आणि उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय योग्य असल्याचे शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीने दाखवून दिले. २२७ पैकी ८४ जागांवर शिवसेनेने निर्विवाद यश मिळवत मुंबई महानगरपालिकेत सलग पाचव्यांदा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान कायम राखले. मतदानाची टक्केवारी पाहिली तर भाजपची यशाची सरासरी ४२ % आहे तर शिवसेनेची सरासरी ३५ % आहे.  २०१२ मध्ये शिवसेनेला महायुतीत असताना ७५ जागा मिळाल्या होत्या तर यावेळेस त्यात फक्त ९ ची वाढ झाली असली तरी ही वाढ शिवसेनेने स्वबळावर केलेली आहे. असे असले तरी शिवसेनेचा स्वबळावर महापाैर करण्यात मात्र पक्षासमाेर अडचणी अाहेत.
 
शिवसेना आणि मुंबई यांचा संबंध अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्द्यावर मुंबईत शिवसेना रुजवली. ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखा आणि तळागाळात पोहोचलेला शिवसैनिक ही ताकद अन्य कोणत्याही पक्षाक़डे नाही. त्यामुळे काँग्रेसने कधीही शिवसेनेला मुंबई मनपात टक्कर देण्याचा प्रयत्न केला नाही. शिवसेना गेल्या चार टर्मपासून मनपात सत्तेवर आहे. 
 
भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचे आरोप झाले तरी मुंबईकर शेवटी शिवसेनेच्याच पाठिशी राहातात हे पुन्हा एकदा दिसून आले.  मनपा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आनंदित झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यामुळेच शिवसेना भवन येथे सपरिवार जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले विजय साजरा केला.
 
या निवडणुकीत भाजपाने मुंबईत ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. यासाठी अनेक आयारामांनाही पक्षात घेऊन तिकीट दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मुंबई पिंजून काढली आणि शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे केले होते. त्यातच शिवसेनेला बंडखोरीचाही सामना करावा लागला. मराठी बालेकिल्ल्यातच शिवसैनिकांनीच शिवसेनेसमोर आव्हान उभे केले, मात्र उद्धव ठाकरे, आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईभर फिरून शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केले. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक शाखेवर जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेचा सुरुवातीला प्रचार थंड होता त्यामुळे शिवसेनेचे काय होईल असा प्रश्न निर्माण झाला होता. 
 
मुंबईच्या समस्यांवर बोलण्याऐवजी नोटाबंदी आणि अन्य विषयावरच उद्धव ठाकरे बोलत असल्याने शिवसेना येईल का असे वाटत होते. मात्र बीकेसी येथे प्रचाराचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले त्यामुळे शिवसैनिक चार्ज झाले आणि त्यामुळेच शिवसेना ८४ जागांपर्यंत मजल मारू शकली. विशेष म्हणजे दादरचा गड पुन्हा ताब्यात घेण्यातही शिवसेना यशस्वी झाली. 
 
एकीकडे असे यश मिळत असतानाच शिवसेनेच्या नेत्यांना पराभवही पत्करावा लागला. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले तर खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, माजी बेस्ट समिती अध्यक्ष सुरेंद्र बागलकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना पराभव पत्करावा लागला.
 
बातम्या आणखी आहेत...