आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडीत चढले थरांवर थर; सुरक्षा नियमांची पायमल्ली, ध्वनिप्रदूषणावर मात्र नियंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उच्च न्यायालयाने उत्सवाचे नियम काहीसे शिथिल केल्याने मंगळवारी मुंबई आणि ठाणे परिसरात पुन्हा एकदा दहीहंडीचा थरथराट पाहायला मिळाला. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत न्यायालयात हमी देऊनही गोविंदा पथके आणि आयोजकांकडून नियमांचे पालन करवून घेण्यात प्रशासनाला साफ अपयश आल्याचेच दिसून आले.
 
परिणामी मुंबई आणि ठाण्यात उत्सवादरम्यान तब्बल १२५ गोविंदा जखमी झाले, तर दोन गोविंदांचा मृत्यू झाला. ध्वनी आणि प्रकाश योजना व्यावसायिकांच्या पाला या संघटनेने ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याची भूमिका घेतल्याने उत्सवादरम्यान डीजेचा आवाज मात्र दरवर्षीप्रमाणे घुमला नाही.    
 
मुंबई आणि ठाण्यात यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, गोविंदा पथके आणि आयोजकांकडून सुरक्षेच्या तसेच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली झाल्याचेच चित्र संपूर्ण मुंबई आणि ठाण्यात दिसत होते. बऱ्याचशा गोविंदा पथकात चौदा वर्षांखालील गोविंदांचा समावेश असूनही त्यांच्या सहभागाबद्दल आयाेजकांकडून कोणताही अटकाव केला जात नव्हता. अनेक ठिकाणी तर सेफ्टी बेल्ट, चेस्ट पॅड आणि मॅटचीदेखील सुविधा नव्हती. सहभागी गोविंदांचे ओळखपत्र आणि विमा उतरवणे सक्तीचे असताना, त्याबाबतची कागदपत्रे तपासण्याची कोणतीही यंत्रणा आयोजकांकडे दिसत नव्हती. एकूणच सुरक्षा उपाययोजनांबाबत आयोजक आणि गोविंदा पथकांनी जेमतेम औपचारिकता पूर्ण केल्याचे दिसून आले.

नऊ थरांची सलामी, तर दहा थरांचा प्रयत्न   
मानवी मनोऱ्यांच्या उंचीच्या मर्यादेबाबत राज्याच्या विधिमंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतल्याने यंदा उंचच उंच मानवी मनोरे पाहायला मिळाले. ठाण्याच्या भगवती मैदानात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने तिसऱ्या प्रयत्नात, तर शिवसाई पथकाने पहिल्याच प्रयत्नात नऊ थरांची सलामी दिली. परिणामी नऊ थरांसाठी असलेले ११ लाखांचे बक्षीस या दोन्ही मंडळांना विभागून देण्यात आले. जय जवान पथकाने दहा थर लावून आपल्याच विक्रमाची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
बातम्या आणखी आहेत...