आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीविरोधात ‘राष्ट्रवादी’चे आज राज्यव्यापी आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून या अन्यायी निर्णयाविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.   

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. कामाच्या ताणामुळे व एटीएमच्या गर्दीत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. 

नोटाबंदीचा सर्वात जास्त परिणाम हा शेती व्यवसाय व पर्यायाने शेतकरी बांधवांवर झाला आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल रस्त्यावर फेकून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. नोटाबंदीमुळे  संपूर्ण देशात अार्थिक मंदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेच्या आक्रोशाला आवाज देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयासमोर संवैधानिक पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संबंधित जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, आजी, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे  तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यापूर्वी नाेटाबंदीच्या निर्णयावर वेगवेगळ्या कार्यक्रमात टीका करुन राज्यस्तरीय अांदाेलनाची घाेषणा केली हाेती. काॅंग्रसनेही सहा व सात जानेवारी राेजी राज्यात याच विषयावर अांदाेलन केले.
बातम्या आणखी आहेत...