आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 5 तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा मंजूर, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनास प्राधान्य देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमरावती जिल्ह्यातील श्री संत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशीम जिल्ह्यातील श्री संत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र या पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंगळवारी मंजुरी दिली. तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी गोष्टींचा समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी दिल्या. 
 
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अमित झनक यांच्यासह प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित हाेते.  

गुलाबराव महाराज जन्मस्थळ
लोणी (ता. नांदगाव) येथील श्री संत गुलाबराव महाराज जन्मस्थळासाठी तयार करण्यात आलेल्या ६ कोटी ६९ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, सभागृह/सत्संग भवन, महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर सुशोभीकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे कांॅक्रिटीकरण आदींचा समावेश आहे. 
 
गुलाबराव महाराज भक्तिधाम
श्री संत गुलाबराव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील भक्तिधाम परिसराच्या विकासासाठी २४.९९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक भवन उभारणी, सायन्स सेंटर बांधणे, आर्ट गॅलरी, विश्रामगृह, जंतरमंतरच्या धर्तीवर बाग तसेच १६ हजार गायींसाठी गाेशाळा यांचा समावेश आहे.  

श्री क्षेत्र रिद्धपूर
मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये सिमेंटचे रस्ते व नाले, स्वच्छतागृह, थीम पार्क आदींचा समावेश आहे. प्रस्तावीत थीम पार्कमध्ये सभागृह, बाग, पार्किंगची सोय, डायनिंग हॉल, बोटिंगची सोय, बाजारतळ आदींचा समावेश असेल. 

श्री संत सखाराम महाराज संस्थान
वाशीम जिल्ह्यातील लोणी (ता. रिसोड) येथील श्री संत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी २० कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी १५ लाखांची कामे केली जातील. यात मंदिराकडे जाणारे रस्ते, पालखी मार्ग यांची कामे, रस्त्याच्या कडील गावातील गटारींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर विजेची सोय, भक्त निवास, प्रसाद साहित्य विक्रीसाठी दुकानांची उभारणी अादी कामांचा समावेश अाहे.मंदिरासमोरच्या जागेत बसस्टॅड व पार्किंग व्यवस्था तसेच वन उद्यानही उभारण्यात येणार आहे.  

श्री क्षेत्र जाेतिबा
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान विकास आराखड्याच्या २५ कोटी रुपयांच्या कामांनाही मंजुरी देण्यात अाली. यात  भक्तनिवास बांधणे, दर्शन मंडप उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व पर्जन्य जलपुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे. भक्त निवासामध्ये २२  खोल्या व ३ मोठे हॉल बांधण्यात येणार आहेत. सेंट्रल प्लाझा येथे ॲम्पिथिएटर प्रमाणेच व्यवस्था व साहित्य विक्री दुकानेही असणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...