आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचकांच्या शेरेबाजीने खराब केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन, मारुती चितमपल्लींनाही शेरेबाजीचे ‘दर्शन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘हे उरलंसुरलं फारसं चविष्ट, रुचकर नाही किंबहुना बेचवच आहे.’ अशी बेधडक शेरेबाजी एका अनामिक वाचकाने केली आहे पु. ल. देशपांडे यांच्या “उरलंसुरलं’ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर. वाचकांनी अशा प्रकारे शेरेबाजी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात येत्या ३० मेपासून सुरू होणार आहे. वाचकांनी शेरेबाजी केलेल्या मराठी पुस्तकांचे हे अशा प्रकारचे राज्यातील पहिलेच प्रदर्शन आहे. शेरेबाजी करून पुस्तके खराब करू, नका असा संदेश या प्रदर्शनातून वाचकांना देण्यात येणार आहे.  
 
या प्रदर्शनाबाबत ग्रंथपाल मंजिरी वैद्य म्हणाल्या, पुस्तकावर वाचकांनी शेरेबाजी करणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे पुस्तकाचे मूळ सौंदर्य नष्ट होते. आमच्या ग्रंथालयात वाचकांनी शेरेबाजी करून खराब केलेल्या ५० हून अधिक पुस्तकांचे प्रदर्शन भरवणार आहोत. शेरेबाजीमुळे पुस्तकांची गेलेली रया बघून वाचकांना काही बोध होईल आणि भविष्यात असे प्रकार थांबतील, असेही  त्या म्हणाल्या.    या पुस्तकांमध्ये अनामिक वाचकांनी नमुनेदार शेरेबाजी केली आहे. ती काही वेळेस सकारात्मक आहे तर बहुतांशी नकारात्मकच आहे. सफर बहुरंगी रसिकतेची या गंगाधर गाडगीळ यांच्या पुस्तकावर एका वाचकाने असा शेरा लिहिला आहे “गं. गा. यांची लेखनशैली खूपच निरस, कंटाळवाणी आहे. वाचताना रमून जाणे होत नाही’,  फाउंटन हेड या कादंबरीचा शिखर या नावाने अनुवाद करणाऱ्या मोहनतारा पाटील यांच्या लेखनशैलीबद्दल लिहिताना एका वाचकाने तिरकसपणे पुस्तकावर लिहून ठेवले आहे “भाषांतर करणे या फंदात पाटीलबाईंनी न पडलेले बरे.’ राजा राजवाडे यांच्या “हास रे घुम्या’ या पुस्तकाच्या एका पानावर वाचकाचा शेरा असा आहे “हे पुस्तक वाचून जो हसेल त्याचा जाहीर सत्कार करावा’, वि. स. खांडेकर रजत-स्मृतिपुष्पांतर्गत डॉ. सुनीलकुमार लवट यांनी संपादन करून प्रसिद्ध केलेल्या “अजून येतो वास फुलांना’ या वि. स. खांडेकरांच्या पुस्तकावर वाचकशेरा असा आहे की, “अजून येतो सुरेख वास फुलांना, हा वास घ्यायलाच हवा’  
 
मारुती चितमपल्लींनाही शेरेबाजीचे ‘दर्शन’
प्रख्यात पक्षीतज्ज्ञ व लेखक मारुती चितमपल्ली पाच मार्च रोजी विलेपार्लेत आले होते. त्यांना त्यांच्या ‘रानवाटा’ या पुस्तकाची फाटक वाचनालयातील प्रत हवी होती. या प्रतीवर वाचकांनी खूप उलटसुलट शेरेबाजी केली होती. शेवटी जिथे शेरेबाजी केली आहे त्या ठिकाणी पांढरे कागद चिटकवून हे पुस्तक मारुती चितमपल्ली यांना देण्यात आले. तरीही काही ठिकाणची शेरेबाजी लपवणे शक्य नव्हते.  त्यामुळे चितमपल्लींना स्वत:च्या पुस्तकावर शेरेबाजी पाहावी लागली.
 
बातम्या आणखी आहेत...