आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप मिटला, डॉक्टर परतले!, गैरसोईबद्दल डॉक्टरांनी मागितली जनतेची माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘सार्वजनिक आरोग्य विभागाील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करून त्यावर मार्ग काढला जाईल’, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) सोमवारी संप मागे घेतला.

सह्याद्री अतिथीगृहामध्ये दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री चव्हाण आणि संपकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बोलणी झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मॅग्मो’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड व सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांना मोसंबीचा रस देऊन सातदिवसीय उपोषणाची सांगता झाली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग. दी. कुलथे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत, त्याविषयी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मंत्रिमंडळासमोर येणार मागण्या
1. 2009-10 मध्ये सेवासमावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्षी लाभ देण्यात यावेत.
2. अस्थायी बीएएमस/ बीडीएस डॉक्टरांना कायम करण्यात यावे.
3. कामाचे तास निश्चित करण्यात यावेत.
4. वैद्यकीय अधिकारी / वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना उच्च वेतनाचे लाभ मिळावा.
5. निवृत्तीचे वय 58 वरून 62 करण्यात यावे, या मॅग्मोच्या मागण्या टप्प्याटप्प्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.

दोन तास जादा काम करणार
संपकाळात सामान्य जनतेची गैरसोय झाली. त्याबद्दल आम्हाला माफ करा. संपकाळातील शस्त्रक्रिया व उपचारांची कर्तव्यभावनेने भरपाई करण्यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी रोज दोन तास अतिरिक्त काम करतील, अशी माहिती मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली.

डॉक्टरांवरील कारवाई मागे
ज्या संपकरी डॉक्टरांवर ‘मेस्मा’ची कारवाई करण्यात आली, ज्या वैद्यकीय अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. तसेच आंदोलनातील सहभागाबाबत डॉक्टरवर आकसाने कारवाई करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.