आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा टिकवण्यासाठी सीमावासीयांना पाठबळ द्यावे, डाॅ. सुधीर मेंडसे यांची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. आनंदीबाई जोशी सभामंडप (डाेंबिवली) - ‘सीमाभागातील सुमारे २५ लाख मराठी बांधव गेल्या तीन पिढ्यांपासून महाराष्ट्रात पुन्हा सामील होण्याची आस बाळगत तेथील मराठी संस्कृती  टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मराठी भाषेचे मारेकरी शोधण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या जतन व विकासासाठी सीमावासीयांना भक्कम पाठबळ व आधार दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा डाॅ. सुधीर मेंडसे यांनी व्यक्त केली.  ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ या विषयावरील परिसंवादात ते बाेलत हाेते.    

डाॅ.  मेंडसे म्हणाले की, ‘आपल्या देशाला भाषाविषयक धोरण नेमके कोणते आहे याचा पत्ताच लागत नाही. त्याचा तोटा सीमाभागातील मराठी जनतेच्या लढ्यात हाेत अाहे.  सीमाभागातील ८६५ खेडी व काही शहरांतील लाखो मराठी माणसे मराठी भाषा संस्कृती वाचविण्यासाठी संघर्ष करत अाहेत, मात्र त्यांचा लढा कर्नाटक सरकार चिरडू पाहत अाहे. देशात प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. बेळगाव, खानापूर तसेच अन्य सीमा भागात मराठी शाळा बंद पडत आहेत. त्याउलट इंग्रजी शाळा उघडण्यासाठी कर्नाटक सरकार उघडउघड प्रोत्साहन देत आहे. हे सर्व रोखण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे, पण ती पार पाडली जात नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनेच सीमाभागातील मराठी शाळा व्यवस्थित सुरू राहिल्या पाहिजेत यासाठी कर्नाटकवर मोठा दबाव आणला पाहिजे,’ अशी अपेक्षाही डाॅ. मेंडसे यांनी व्यक्त केली.    
प्रा. कमलाकर कांबळे म्हणाले की, ‘छत्तीसगड, कारवार, गुजरात, इंदूर, उज्जैन अादी परराज्यातील काही  विद्यापीठांत मराठी विभाग अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या मराठी विभागांची विलक्षण दुरवस्था असून तेथे नव्या प्राध्यापकांची नियुक्ती हाेत नाही. बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या तेथील मराठी विभागाला ऊर्जितावस्थेला आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संबंधित राज्यांवर दबाव आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रातही चपराशापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण मराठीचे मारेकरी आहेत की काय असे वाटावे, असे वातावरण आहे.’  
अॅड. शांताराम दातार म्हणाले, ‘सर्वच राजकीय पक्ष सध्या मराठीच्या मारेकऱ्यांच्या भूमिकेत अाहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडेही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणताही कार्यक्रम नसतो.’ या वेळी कृष्णाजी कुलकर्णी, अमृता इंदूलकर, पत्रकार ज्ञानेश महाराव यांचीही भाषणे झाली.  
 
मराठीच्या मुद्द्याचा वापर फक्त निवडणुकांमध्ये प्रचारापुरताच : डाॅ. पवार
मराठी साहित्य संमेलनात रविवारी झालेल्या ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ या परिसंवादात सहभागी झालेले मान्यवर वक्ते.
 
निवडणुकीमुळे दडवले मराठी भाषा धाेरण  
डाॅ. दीपक पवार म्हणाले की, ‘मराठीसाठी काम करणारे दोन पक्ष आहेत; पण त्यांच्या कामामुळे मराठीचे भले होईल याची अजिबात शाश्वती नाही. मुळात मराठी भाषेबाबतचे काम करून मते मिळणार नसल्याने मराठीच्या मुद्द्याचा वापर फक्त निवडणुकांध्ये प्रचारापुरताच होतो. मराठी भाषेचा विकास व तिचे संवर्धन हा मुख्य प्रवाहातील मुद्दा कधीच बनत नाही. भाषा धोरणाचा मसुदा तयार असूनही मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने ताे जनतेसमोर ठेवला जात नाही. कारण मराठी लोकांसाठी आम्ही काहीतरी करत आहोत हे अमराठी लोकांसमाेर किमान निवडणुकीच्या काळात तरी जाऊ नये हीच धडपड सध्या सत्ताधाऱ्यांची अाहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
 
बातम्या आणखी आहेत...