आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

171 पाणीपुरवठा प्रकल्पांचे एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - राज्याच्या विविध भागांत मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, हवामान केंद्र, साठवण टाक्या, पाणी शुद्धीकरण संयंत्र, पाणी तपासणी प्रयोगशाळा अशा पाणीपुरवठाविषयक विविध १७१ प्रकल्पांचे साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी मुंबईतून ई-भूमिपूजन करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे या सर्व प्रकल्पांच्या कामाचा शुभारंभ केला. मंठा (जि. जालना) येथील स्वयंचलित हवामान केंद्राचाही यात समावेश अाहे.   
 
या वेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी अादी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याच्या विविध भागांतील पाणी योजनांचे एकाच वेळी भूमिपूजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून १००३ नळपुरवठा योजना तसेच ८३ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. भूजल पातळी राखण्यासाठी तसेच ती वाढवण्यासाठी ॲक्विफर मॅपिंगसुद्धा करण्यात येईल. त्यामुळे भूजल पातळीचे निरीक्षण करता येईल तसेच भूजल साठ्याच्या वापराचे नियोजन करणे शक्य हाेईल.’ दरम्यान, १७१ प्रकल्पांची कामे एकूण ११९ काेटी ७७ लाख रुपये खर्च करून हाेणार असल्याची माहिती लाेणीकर यांनी दिली.  
 
या पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या उंबर्डा बाजार, वनोजा, वारला,  जऊळका, म्हसनी, चिंचांबाभर, भामदेवी, दुबळवेल, चांडस, करडा (सर्व जि. वाशीम), पराडा (जि. जालना), पुतळी (जि. गोंदिया), तळोधी बाळापूर (जि. चंद्रपूर) या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन झाले. तसे ‘जलस्वराज्य -दाेन’ कार्यक्रमातून मंजूर करण्यात आलेल्या रेठरे बुद्रुक, गोळेश्वर (दोन्ही जि. सातारा), शिरसगाव (जि. नगर),  एकार्जुना, नांदगाव जानी, आवारपूर (तिन्ही जि. चंद्रपूर), सगरोळी, अर्जापूर (दोन्ही जि. नांदेड), वाघोदे (जि. जळगाव) या पाणीपुरवठा योजनांचे या वेळी ई-भूमिपूजन करण्यात आले.   
 
१६ जिल्ह्यांत पाणी तपासणी प्रयोगशाळा  : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. साेमवारच्या कार्यक्रमात सातारा, जळगाव, अहमदनगर, हिंगोली, लातूर, परभणी, सांगली, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, जालना, सोलापूर, नंदुरबार व गडचिरोली येथील पाणी तपासणी प्रयोगशाळांचे ई-भूमिपूजन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...