आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी पेपरफुटीप्रकरणी मुंबईत आठ जणांना अटक, असा फोडला जात होता पेपर?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - गेल्या आठवड्यात झालेल्या बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. बारावी कॉमर्सच्या सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आणखी चार जणांना शनिवारी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये पालघरच्या एका महाविद्यालयाच्या संचालकाचा समावेश असून आतापर्यंत याप्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.    
 
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या कॉमर्स शाखेचा सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाचा पेपर व्हॉट्सअॅपवर फुटल्याची तक्रार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाच्या मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे याप्रकरणी विरारच्या माउंट मेरी शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक आनंद कामत यांना अटक केली. याच शाळेचा वरिष्ठ लिपिक गणेश राणे याच्यासह अॅड. निखिल राणे आणि विनेश धोत्रे या दोन खासगी क्लासेसच्या चालकांनाही नवी मुंबई पोलिसांनी विरार येथून अटक केली. या सर्वांना न्यायालयाने १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अझरुद्दीन शेख, मोहंमद अमन शेख आणि राहुल भास्कर या तीन विद्यार्थ्यांसह सुरेश झा या एका खासगी क्लासेसच्या संचालकाला कांदिवली आणि मालाड येथून अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अाधारेच आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांंनी १२ ते १३ व्हॉट्सअॅप ग्रुपवर नजर ठेवली होती. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. असून त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.   
 
व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेले पेपर
२ मार्च रोजी : मराठी
३ मार्च रोजी : राज्यशास्त्र
४ मार्च रोजी : सेक्रेटरियल प्रॅक्टिस, भौतिकशास्त्र
६ मार्च रोजी : गणित, संख्याशास्त्र
१० मार्च रोजी : बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी
 
असा फोडला जात होता पेपर?  
आनंद कामत आणि गणेश राणे हे दोघे आपल्या मोबाइल कॅमेऱ्याद्वारे शिक्षण मंडळाकडून प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकांची छायाचित्रे काढून ती निखिल राणे या क्लासचालकाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवत असत. मग राणे ती छायाचित्रे विनेश धोत्रे याला शेअरइट या अॅपच्या माध्यमातून पाठवत असे. पुढे धोत्रे विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करून या प्रश्नपत्रिका त्यांना विकत असे. त्यातून आलेला पैसा हे चौघे वाटून घेत असत, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...