आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकांचे \'रण\' : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता सुरू होणार मतदारराजाच्या \'भेटीगाठी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात गेले महिनाभर सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर तुंबळ टीका चालू होती, आरोप- प्रत्यारोपांची नुसती राळ उडाली. कोणताही विधिनिषेध न ठेवता प्रतिस्पर्ध्यावर आरोपांची चिखलफेक सुरू होती. मात्र, रविवारी सायंकाळी ११ जिल्हा परिषदांच्या दुसऱ्या टप्प्यातील व दहा महापालिकांच्या प्रचाराच्या ताेफा थंडावल्या. 
 
मंगळवारी या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान हाेत असून अाता साेमवारी केवळ ‘गनिमी काव्या’ने प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यातील २५ जिल्हा परिषदा व दहा महापालिकांची मतमाेजणी २३ फेब्रुवारी राेजी हाेईल. 
 
 
रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभांना फाटा देत उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटीवर भर दिला. त्यासाठी रोड शो, पदयात्रा, बाइक रॅली मोठ्या प्रमााात काढल्याचे दिसले. परिणामी मुंबईसारख्या शहरात सुटीचा दिवस असूनही ट्रॅफिक जामचा प्रश्न उद‌्भवला. 
 
मुंबईतील कफ परेड भागात भाजप उमेदवार मकरंद नार्वेकर यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केला, तर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘एमआयएम’च्या रॅलीवर हल्ला केल्याची घटना घडली. 
 
भाजप आमदार प्रशांत परिचारक (पंढरपूर) यांनी लष्करी जवानासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर रविवारी चर्चेत राहिले.  साेलापूर जिल्ह्यात अांदाेलन पेटल्यानंतर मात्र परिचारिकांनी माफी मागितली. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भाजप बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात भाषण झाले. 
 
‘ठाण्यात आनंद दिघे यांची शिवसेना आता राहिली नाही’ अशी टीका त्यांनी या मेळाव्यात केली. वरळी भागात राष्ट्रवादीचे मुंबई प्रमुख सचिन अहीर यांनी रॅली काढली, तर मुंब्रा-कळवा भागात ‘एमआयएम’च्या मोठ्या बाइक रॅलींनी लक्ष वेधून घेतले. 
 
 काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार आिण शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत सर्वाधिक जागा आपलाच पक्ष जिंकणार, असे दावे त्यांनी केले. मुंबईत भाजपच्या सर्वाधिक ७६ सभा झाल्या असून बॅनर, होर्डिंग्जमध्ये भाजपचा वरचष्मा दिसला. 
 
  प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी कार्यकर्ते- उमेदवार आज रस्त्यावर होते. बडे नेते मात्र सभा नसल्याने घरीच होते. ‘मातोश्री’, ‘वर्षा’ अाणि ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी पत्रकार अाणि ओबी व्हॅनची मोठी गर्दी होती. प्रत्यक्ष प्रचार संपल्याने रविवारी रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.      
 
भरारी पथके तैनात  
मतदानाच्या शेवटचे दोन दिवस मुंबईतील चाळी, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये साड्या, धान्य, पैसे वाटप होते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पालिकेने १३ स्टॅटिक पथके, ९८ भरारी पथके, ३९ व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके तैनात केली आहेत. तसेच पोलिस, आयकर, विक्रीकर, गुप्तवार्ता विभागाचीही नजर असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.    
 
मतदानासाठी उद्या सुटी    
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांच्या  मतदान क्षेत्रांतील  विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी भरपगारी सुटी द्यावी, असे कामगार आयुक्त, मुंबई यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे. पहिल्या टप्प्यात मतदान न झालेल्या गडचिराेली जिल्हा परिषदेतील उर्वरित गटांसाठी मंगळवारी मतदान हाेणार अाहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...