आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेनड्राइव्हद्वारे पुस्तक प्रचाराचे नवे प्रवाह; विश्वकोशाच्या प्रयोगानंतर मिळाली चालना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेन ड्राइव्हमध्ये विश्वकोश साठविलेला आहे ते सुचित करणारा फोटो - Divya Marathi
पेन ड्राइव्हमध्ये विश्वकोश साठविलेला आहे ते सुचित करणारा फोटो
मुंबई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने बुकगंगा डॉट कॉमच्या सहकार्याने मराठी भाषादिनी विश्वकोशाचे वीस खंड पेनड्राइव्हमध्ये  उपलब्ध करून दिले. त्यामुळे हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध नसलेल्या राज्यातील अनेक ठिकाणच्या वाचकांना एक नवी सुविधा उपलब्ध झाली आहे. पेन ड्राइव्हमध्ये  पुस्तके साठवून ती वाचकापर्यंत नेण्याचा एक नवा प्रवाह यानिमित्ताने सुरू झाला असून आगामी काळात त्याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण होईल.   
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडे २० खंडांचा मजकूर तयार आहे. मात्र, वीस खंडांपैकी काही खंड अद्याप पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेले नाहीत. तसेच विश्वकोशाचे  खंड जाडजूड असल्याने ते हाताळायलाही काहीसे अवघड होते. त्यामुळे या वीस खंडांच्या सहा सीडींचा संच मंडळाने तयार करून घेतला होता. त्याचे वजन अवघे ४५० ग्रॅम इतके होते. तसेच या खंडांचा सर्व मजकूर https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ या मंडळाच्या वेबसाइटवरही  उपलब्ध आहे. गावोगावीच्या लोकांकडे आता संगणकांची संख्या वाढत असली तरी हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध असेलच याची अजूनही खात्री नाही. त्यामुळे सीडी उपलब्ध असल्या तरी विश्वकोशाच्या वेबसाइटवर जाऊन ते खंड पाहणे ग्रामीण भागांतील विद्यार्थी व इतर वाचकांना शक्य होत नव्हते.   

बुकगंगा डॉट काॅमचे संचालक मंदार जोगळेकर म्हणाले, िवश्वकोशाच्या वीस खंडांचा मजकूर युनिकोड स्वरूपात चार जीबी क्षमतेच्या एका पेन ड्राइव्हमध्ये साठवण्यात आला असून तो वाचकाला ८०० रुपयांना देण्यात येतो. या पेन ड्राइव्हची  एक वर्षाची गॅरंटी असून तो एका वेळेस एका संगणकावर वापरता येतो. विश्वकोश मंडळाकडून  ग्रंथालीमार्फत बुकगंगाला या पेन ड्राइव्हचे  तंत्रज्ञान विकसित करून वितरणाची जबाबदारी मिळाली आहे. या पेन ड्राइव्हतील मजकुराची कोणी कॉपी करू नये किंवा पायरसी होऊ नये म्हणून बुकगंगाने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्या संगणकांमध्ये पेन ड्राइव्ह जोडण्याची तांत्रिक सोयही असते. तसेच सीडी, डीव्हीडीपेक्षा आता पेन ड्राइव्हमध्ये  साठवलेल्या गोष्टी पाहण्याकडे संगणक वापरकर्त्यांचा कल असल्याने विश्वकोशाचा प्रसार या नव्या माध्यमातून वाचकांपर्यंत अजून वेगाने होईल. भविष्यात संस्कृती कोश व अन्य प्रकाशनांची पुस्तके पेन-ड्राइव्हच्या माध्यमातून नेण्याचा बुकगंगाचा मानस आहे.   
 
पेनड्राइव्हतील विश्वकोशाला मोठ्या प्रमाणावर मागणी   
विश्वकोश साठवलेल्या पेनड्राइव्हला अलिबाग, विदर्भ, कोकण, खान्देश, सांगली, सातारा व अमेरिकेतूनही मागणी आली अाहे. अलिबागमधील एका व्यक्तीने शाळेच्या मुलांसाठी  विश्वकोशाचे शंभर पेनड्राइव्ह विकत घेतले आहेत. मराठवाड्यातूनही या पेन ड्राइव्हबाबत विचारणा होत आहे. मराठी भाषादिनी अनावरण झाल्यानंतर आजवर विश्वकोशाच्या सुमारे ४०० पेनड्राइव्हची विक्री झाली आहे. आपली पुस्तके अशाच प्रकारे पेनड्राइव्हतून गावोगावीच्या वाचकांपर्यंत नेता येतील का याची चाचपणी काही प्रकाशकांनीही बुकगंगा डॉट कॉमकडे केली आहे.
बातम्या आणखी आहेत...