आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : शिवसेना-भाजप दोघांनाही समान संधी (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या २५ वर्षांपासून युतीचे सरकार असलेल्या मुंबई महानगरपालिकेत या वेळेस मात्र परिवर्तन होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन वेळच्या निवडणुकांपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढलेली असल्याने वाढलेला टक्का हा सत्ता परिवर्तनाचे लक्षण असते, असे म्हटले जाते. त्यामुळे भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो; मात्र शिवसेना-भाजप दोघांनाही सत्तेची समान संधी मिळेल, अशी शक्यता आहे. 
 
 
शिवसेना आणि भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वेगळी वाट चोखाळली. पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच पेचात पकडले. भाजपच्या या गुगलीत शिवसेना अडकली आणि करून दाखवलेल्या कामांऐवजी पारदर्शी कारभाराचे स्पष्टीकरण देत प्रत्युत्तरापोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
 
शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे ही निवडणूक लोकसभेची तर नाही ना? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात उद्भवला होता. सत्तेवर असलेल्या भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला आणि मुंबईकरांपुढे एक सशक्त पारदर्शी कारभार देणारा पक्ष म्हणून भाजपची इमेज तयार केली, दुसरीकडे शिवसेनेला बंडखोरीने ग्रासले.
 
मराठी बालेकिल्ल्यात बंडखोरी झाल्याने जागा टिकवून ठेवण्याचे कठीण काम करण्यासोबत भाजपच्या नेत्यांच्या आरोपांना उत्तरे देण्यातच शिवसेनेची ताकद खर्च होऊ लागली आणि याचा परिणाम निकालात निश्चितच दिसेल. 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१ उमेदवार उभे करून स्वबळ दाखवले असले तरी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बोलण्यावर मतदारांचा विश्वास नसल्याने त्यांची संख्या दुहेरी आकड्याच्या आत राहील. याचा मोठा फटका मनसेला बसणार असून राज ठाकरे यांना मनसेची नव्याने रचना करावी लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या २५ वर्षांत कधीही गंभीरपणे लढवली नाही.
 
या वेळी तर या दोन्ही पक्षांनी निवडणुकीआधीच हार मानलेली दिसून आली. एकूणच निकालानंतर भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल. दोघांमध्ये १५ ते २० जागांचा फरक असेल. सत्तेसाठी शिवसेनेसोबत जाण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेतच, परंतु शिवसेनेने युती कायमची तोडली, तर अन्य पक्षांचा पर्याय घेऊन भाजप सत्ता स्थापन करू शकते.
 
बातम्या आणखी आहेत...