आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे प्रयत्न घातकच; मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे परखड मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाेंबिवली- ‘ब्राह्मण असो वा बहुजन, दलित असो वा आदिवासी यांच्यापैकी कोणीही इतिहासाचे विकृतीकरण करत असेल तर ते अत्यंत घातक आहे. इतिहास हा विशुद्धच असला पाहिजे. महाराष्ट्राला सध्या शुद्ध सांस्कृतिकता, अाध्यात्मिकतेची गरज आहे,’ असे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी  शुक्रवारी संमेलनाच्या व्यासपीठावरून केले.
   
सबनीस म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पवारांचे बोट धरून राजकारणात आले असतील तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अाता मोदी यांच्या बोटाला धरून त्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी करून घ्यावी लागेल. मराठीचा सांस्कृतिक नकाशा तुटलेला, फाटलेला कोणालाच नको आहे. त्यासाठी राज्य सरकारबरोबरच विद्वज्जनांनी, सामान्य माणसांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी काँग्रेस सरकारच्या साक्षीने मोकाट सुटले. भाजप-शिवसेनेचे राज्य आल्यानंतरदेखील हे मारेकरी जेरबंद  होतील की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. विवेकी महाराष्ट्राच्या अंत:करणात याबद्दल आक्रोश आहे. सनातनी धर्माची मूल्ये ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे लक्षण  नाही. सध्या पुरोगामी, सुधारणावादी विचार करणाऱ्या लोकांना आपण सुरक्षित राहू की नाही याची शाश्वती नाही. महाराष्ट्रात नथुराम गोडसे याचे गोडवे गाणारे नाटक केले जाते, त्याची देवळे उभारण्याची भाषा होते. दहशतवादाची ही रूपे महाराष्ट्राला ग्रासू पाहत अाहेत. या दहशतवादाचा मी निषेध करतो. 
   
गांधीजींना मारणारा नथुराम हा ब्राह्मण होता त्यामुळे बहुजन समाज आजही ब्राह्मण समाजाला दोषी मानत आलेला आहे. ब्राह्मणांचा जातीयवाद जसा विषारी, बहुजनांचा जातीयवाद हादेखील त्याच प्रकारचा आहे. दलित, आदिवासींचा जातीयवादही अयोग्य आहे. सध्या समाजाला शुद्ध धार्मिकता, सांस्कृतिकता यांची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

महामंडळाला मिळावा लाेकाश्रय : श्रीपाद जाेशी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थेच्या कार्याविषयी खूप अपेक्षा व्यक्त केल्या जातात. ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडाला दगड मारले जातात. त्याचनुसार महामंडळाविषयी अपेक्षा व्यक्त केल्या जातात. संमेलनाचे आयोजक, स्वागताध्यक्ष यांचा इतिहास बघितला तर महात्मा फुले यांना अपेक्षित होते त्या बहुजन समाजातील प्रतिनिधीच हे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेत आहेत हे  दिसून येईल. महाराष्ट्र सरकार साहित्य महामंडळाला वर्षभरात देत असलेल्या  ५ लाखांच्या निधीतून काहीही भरीव करता येणे शक्य नसते. सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नये, असे आमचेही मत आहे. यासाठी साहित्य महामंडळाला लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे, असे सांगतानाच मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे अावाहनही जाेशींनी केले.

पुढील स्लाइडवर वाचा... अाम्हाला विदर्भात घ्या : खरे
बातम्या आणखी आहेत...