आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकारची दाेन वर्षांची कामगिरी पोहोचवणार गावागावांत, प्रत्येक जिल्ह्यात दोनशे अहवाल पाेहाेचवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामगिरीच्या जाहिराती वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांवर सुरू असतानाच प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारची कामगिरी पोहोचावी यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांत सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची एक पुस्तिका तयार करण्यात आली असून ती ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न हाेत आहे.
   
गेल्या दोन वर्षांत सरकारने ग्रामीण आणि शहरी भागासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. हे निर्णय जनतेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने पोहोचवले जातात. त्याची माहिती दिली जाते, परंतु प्रत्येक निर्णय जनतेपर्यंत पोहोचतोच असे नाही. जाहिरातींमधूनही सर्व निर्णयांची माहिती मिळतेच असेही नाही. त्यामुळे सरकारचे निर्णय घराघरांत पोहोचवण्यासाठी एक २० पानांची रंगीत पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेत अरबी समुद्रातील शिवस्मारक, जलयुक्त शिवार योजनेसह सिंचनाच्या अन्य योजना, शेतकरी विमा, आर्थिक मदत, आत्महत्याग्रस्त भागात करण्यात आलेल्या ठोस उपाययोजना, शिक्षण विभागाच्या योजना, ईबीसी सवलत, उद्योग विभाग, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, गृह विभागाच्या सीसीटीव्हीसह अनेक योजना आणि मुंबईच्या विकासासाठी सरकारने घेतलेले निर्णय देण्यात आलेले आहेत.
   
मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले, या पुस्तिकेमध्ये फक्त महत्त्वाचे निर्णयच असतील. ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत त्याची माहिती व्हावी हा उद्देश या पुस्तिकेचा आहे. एक-दोन महिन्यांत  प्रत्येक जिल्ह्यात १५० ते २०० पुस्तिका पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर या पुस्तिका ग्रामसेवक, सरपंच, तलाठी कार्यालयाकडे पाठवल्या जातील आणि त्यातील योजनांची माहिती प्रत्येक घरात दिली जाईल. त्यामुळे सरकारने दोन वर्षांत काय काय केले त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. 
  
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी  
या पुस्तिकेत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो असून मुखपृष्ठावर आपले सरकार कामगिरी दमदार, वाटचाल अविरत ध्येयाकडे असे छापण्यात आले आहे. मलपृष्ठावर मुंबईच्या मेट्रो प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. एकूणच सरकारने आगामी निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीचीही तयारी केल्याचेच यातून दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...