आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी मदत 8 दिवसांत खात्यावर जमा : महसूलमंत्री एकनाथ खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या ८ दिवसांत दुष्काळी मदतीची रक्कम जमा होईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. अंतिम अथवा प्रारूप विकास आराखड्यानुसार शेतजमिनीचा व्यावसायिक वापर करण्यासाठी लागणारी एनएची अट रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थिती आणि मदतीबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर खडसे यांनी पत्रकारांना सांगितले की, दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने पाठवलेला निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. ही रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. कापूस उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्याची अंतिम आणेवारी अजून आलेली नाही. ती आल्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्यापोटी पैसे दिले जाणार आहेत. राज्य सरकारही विम्यापेक्षा ५० टक्के ज्यादा रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे.
सोलापूरमधील रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. त्याची प्राथमिक आणेवारी उपलब्ध झाली आहे. मात्र अंतिम आणेवारी पुढील महिन्यात येणार असून त्यानंतर टंचाईग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत दिली जाईल अशी माहितीही त्यांनी सोलापूरमधील दुष्काळग्रस्तांबाबत प्रश्न विचारला असता सांगितले.
राज्यातील शेतजमिनींना एनए परवाने देण्याचा कायदा १०० वर्ष जुना असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. भ्रष्टाचारही वाढतो आणि वेळही जातो. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२ नंतर आता कलम ४२ अ हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे अंतिम अथवा प्रारूप विकास आराखड्यानुसार जमिनीचा वापर करण्यास पूर्व परवानगीची आवश्यकता भासणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना फायदा होईल असेही ते म्हणाले.
एखाद्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा विकास करायचा असेल तर त्याला जमिनीबाबतची विकास आराखड्यानुसारची माहिती ३० दिवसात देण्याचे बंधन तहसीलदारांवर घालण्यात आले आहे. विकास परवाना देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत. ज्या जमीनमालकाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्याने त्या व्यवसायाची माहिती संबंधित विभागाला द्यायची असून त्याला सनद देण्यात येईल आणि तो व्यवसाय सुरु करू शकेल, असेही खडसे म्हणाले.