आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फॉलो’ करणे नव्हे, तर नेतृत्व हीच टाटा समूहाची खरी ओळख : चंद्रशेखरन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या टाटा सन्सच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच बिगरपारशी व्यक्तीला संधी मिळाली आहे. एन. चंद्रशेखरन यांनी सात लाख कोटी रुपयांच्या या समूहाची जबाबदारी मंगळवारी स्वीकारली. नेतृत्व करणे ही टाटा समूहाची ओळख असून हा समूह कुणालाही “फॉलो’ करत नसल्याचे त्यांनी सांगितले. याच नेतृत्वातून शेअरधारकांना चांगला परतावा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रशेखरन यांनी याआधीदेखील टीसीएसमध्ये त्यांच्यातील नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत.
 
 
माझ्यासाठी तीन सर्वात अग्रक्रमाने करण्याच्या गोष्टी असल्याचे चंद्रशेखरन यांनी या वेळी सांगितले. यात पहिली म्हणजे समूहाची एकत्रित ताकद वाढवण्यासाठी समूहाला एकजूट करणे. दुसरे समूहातील कंपन्यांमध्ये नेतृत्वाची मानसिकता लागू करून शेअरधारकांना जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. तिसरे म्हणजे समूहात जागतिक पातळीवरील कार्यक्षमता मिळवणे.  
 
चंद्रशेखरन यांनी त्यांच्या कक्षाची रचना जेआरडी टाटा यांच्या कार्यकाळातील रचनेप्रमाणे केली आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. त्या वेळी मिस्त्री यांनी घेतलेले निर्णय टाटा सन्सच्या परंपरेशी जुळत नसल्याचा आरोप रतन टाटा यांच्या समर्थकांनी केला होता. अशा परिस्थितीत या कक्षाची जेआरडी टाटा यांच्या कार्यकाळाप्रमाणे रचना करून आपण या कंपनीतील परंपरेला पुढे नेणार असल्याचे संकेत चंद्रा यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.  

त्यांचे समूहात महत्त्वपूर्ण योगदान राहील : रतन टाटा  
एन. चंद्रशेखरन यांनी पदभार स्वीकारण्याआधी समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचे स्वागत करण्यात आले. चंद्रशेखरन यांनी टीसीएसमध्ये त्यांच्यातील नेतृत्वगुण सिद्ध केले असल्याचे मत या वेळी रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाबाबत विश्वास व्यक्त करत ते टाटा समूहाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असे मतही टाटा यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...