आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : मराठी रसिकांसाठी ‘दादांची लायब्ररी’; नाटक, चित्रपटांचेही घडणार दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - वीरेंद्र मोकदम व प्रेरणा इथापे दांपत्याने या पती-पत्नीने आपल्या पुण्यातील घरी छोटेसे ग्रंथालय सुरू केले होते. मात्र, ही पुस्तके फक्त मित्रमंडळींपुरतीच का मर्यादित ठेवायची, असा विचार करून  त्यांनी “दादांची डिजिटल लायब्ररी’ हे फेसबुक पेज व प्रेरणा वीरेंद्र क्रिएशन्स हे युट्यूब चॅनल सुरू केले. याद्वारे राबवण्यात येणाऱ्या “वाचा आनंदे’ या उपक्रमात सध्या दर दोन महिन्याला एकदा विविध कवींच्या सुमारे दहा ते पंधरा कवितांचे अभिवाचन  वाचकांकडून सादर केले जाते. त्या वाचकांना वीरेंद्र व प्रेरणा स्वत: अभिवाचनाचे प्रशिक्षण देतात.   
 
“वाचा आनंदे’ या अभिनव प्रकल्पाला वाचकांचा वाढता प्रतिसाद असून पुढे या फेसबुक पेज व चॅनलवर आपल्या संग्रहातील पुस्तके डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा या जोडप्याचा मानस आहे. मोकदम म्हणाले, माझे आजोबा व प्रेरणाचे आजोबा यांना वाचनाची खूप आवड होती. त्या दोघांच्या संग्रहातील पुस्तके आमच्याकडे होती. त्याशिवाय आम्हालाही वाचनाचा छंद असल्याने आम्हीही काही पुस्तकांचा संग्रह केला. त्यातून आमच्याकडे ८०० हून अधिक पुस्तके जमा झाली होती. मग पुण्याला वारजे येथे आमच्या घरीच मित्रमंडळींसाठी एक दादांची लायब्ररी या नावाने छोटेखानी ग्रंथालय सुरु केले. पण ती पुस्तके शेवटी मर्यादित लोकांपुरतीच राहिली असती. त्यातून मग कल्पना सुचली. ही सर्व पुस्तके सर्वांनाच वाचायला मिळावीत म्हणून आम्ही “दादांची डिजिटल लायब्ररी’ नावाने फेसबुक पेज सुरु केले.   या पेजची लिंक https://www.facebook.com/prernavirendradadanchilibrary/ अशी अाहे, तर प्रेरणा वीरेंद्र क्रिएशन्स या युट्यूब चॅनलची लिंक https://www.youtube.com/user/virendramokadam अशी आहे.   
 
नाटक, चित्रपटांचेही घडणार दर्शन   
साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, लोकचित्रकला, किंवा अलीकडच्या काळातील प्रचलित अनेक दर्जेदार नाटक आणि चित्रपट हा सगळा आजवर आपल्याला लाभलेला, समृध्द आणि श्रीमंत असा वारसा आहे. चांगला माणूस होण्यासाठी आपल्याला या सगळ्यांचे भान असणेही गरजेचे आहे. माणूस म्हणून आपलं जगणं अधिक समंजस, शहाणं आणि अधिकाधिक उदार होत जातं. याच आशयाने प्रेरित होऊन दृकश्राव्य माध्यमाद्वारे सर्वोपयोगी ठरेल, अशा उपक्रमांची निर्मिती करून ते सर्व व्हिडिओज ऑनलाइन सोशल मीडियातून प्रकाशित करून ते महाराष्ट्रभरातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...