आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही आक्रमणाचा मुकाबला करण्यास सज्ज फोर्स वन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘एनएसजी’च्या धर्तीवर राज्यातही फोर्स वनची स्थापना तत्कालिन राज्य सरकारने केली हाेती. ‘फोर्स वन’चे पथक आता पूर्णपणे तयार झाले असून गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांना चकित केले. राज्यात काेणत्याही हल्ल्याला ताेंड देण्यास हे पथक सज्ज असल्याचेच या जवानांनी दाखवून दिले.

फोर्स वनचे कार्यालय असलेल्या सहा मजली इमारतीच्या गच्चीवरून शस्त्रसज्ज दाेन कमांडोंनी जमिनीकडे तोंड करीत बाहेरच्या बाजूने दोरीवरून सरासरा तीन मजले पार केले. तिसऱ्या मजल्यावरील पॅसेजजवळ थांबून हत्यारे काढली आणि काल्पनिक अतिरेक्यांना टार्गेट केले. पुन्हा तसेच जमिनीवर येऊन पुन्हा खाली असलेल्या काल्पनिक अतिरेक्यांना टार्गेट केले. दुसऱ्या बाजूला एका इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीचे अंतर दोरीच्या सहाय्याने एका कमांडोने पार करुन दुसऱ्या इमारतीत प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठच आणखी एका कमांडोने दोन इमारतींमधील दोरीवरून रॅपलिंग केले. थोड्याच वेळात अनेक कमांडोंनी इमारतीच्या गच्चीवरून सरासरा दोरीवरून उतरत कसरती दाखवल्या. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या पराक्रमाला दाद दिली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमांची छायाचित्रे जाहीर करण्यात अाली नाहीत.

पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळातर्फे ८५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या फोर्स वन प्रशासकीय इमारत, वसतिगृह, १४० अधिकारी कर्मचारी निवासस्थानांचे उद‌्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात अाले. ‘आजवर मी चित्रपटांमध्ये अशी चित्तथरारक दृश्ये पाहिली होती. परंतु तेथे सुरक्षेची साधने असतात, चांगले एडिटिंग केले जाते त्यामुळे रोमांच वाटतो. परंतु येथे तर फोर्स वनच्या कमांडोंनी प्रात्यक्षिके दाखवून चित्रपटातील दृश्यांवरही मात केली. ही प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोठेही अतिरेकी हल्ला झाला तर त्याचा आपण सक्षमपणे मुकाबला करू शकतो याची खात्री पटली,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

फोर्स वनचा कमांडो सौरभने (नाव बदलण्यात आले आहे) सांगितले, ‘गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही येथे प्रशिक्षण घेत आहोत. निशस्त्र मुकाबला ते सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले आहे. आमचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले असून प्रत्येकावर वेगळी जबाबदारी दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यास अाम्ही सक्षम अाहाेत. जगातील सर्व आधुनिक शस्त्रे इथे उपलब्ध असून ती अाम्हाला चालवता येतात. आज दाखवलेले प्रात्यक्षिक आमच्यासाठी नवीन किंवा वेगळे नाही.’
बातम्या आणखी आहेत...