मुंबई - राज्यातील चारही टप्प्यांतील २१० नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्या. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या आघाड्यांवर भाजपने पहिला क्रमांक पटकावून राज्यात आपणच नंबर वन स्थान पक्के केले अाहे. नगराध्यक्षांच्या एकूण जागांपैकी ३७ टक्के, तर नगरसेवकांच्या एकूण जागांपैकी ४४ टक्के जागा जिंकून भाजपने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या दोन्ही आघाडीवर काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
राज्यात नगराध्यक्षांच्या १९१ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी भाजपने ७१ जागा जिंकल्या असून काँग्रेस आणि उर्वरित. राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागांच्या बेरजेपेक्षा अधिक या जागा आहेत. पक्षनिहाय विजयी नगराध्यक्षांच्या संख्येचा विचार केला तर भाजपनंतर काँग्रेसने दुसरा, तर शिवसेनेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने नगराध्यक्षाच्या ३४, शिवसेनेने २६, तर राष्ट्रवादीने २२ जागा जिंकल्या.
राज्यातील १९१ नगर परिषदा आणि १९ नगरपंचायती मिळून २१० ठिकाणी २६ नोव्हेंबर १६ ते ८ जानेवारी १७ दरम्यान चार टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या. यापैकी केवळ तिसऱ्या टप्प्यात काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक नगरसेवक जिंकून पहिला क्रमांक पटकावला होता. यात प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील यशाचा माेठा वाटा हाेता. उर्वरित तिन्ही टप्प्यांत भाजपच अव्वल ठरला. विदर्भ हा भाजपचा आता बालेकिल्ला असल्याने येथील सर्वच विभागात भाजपने ५० ते ८० टक्के जागा जिंकल्या आहेत.
नाेटाबंदीच्या निर्णयावर मतदारांकडून शिक्कामाेर्तबच : रावसाहेब दानवे
नगर पालिका निवडणुकीच्या चारही टप्प्यात मतदारांनी भाजपला भरघाेस यश दिले अाहे. हा एेतिहासिक विजय असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी घेतलेल्या नाेटाबंदीच्या निर्णयावर जनतेने शिक्कामाेर्तबच केले अाहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. ते म्हणाले, ‘चारही टप्प्यांचे निकाल बाहेर अाल्यानंतर राज्यात भाजपच नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध झाले अाहे. माेदी व फडणवीस सरकारच्या कारभारला या माध्यमातून जनतेने पसंती दिली अाहे. भाजपचे पक्षाच्या चिन्हावर ७२ नगर पालिकांत वर्चस्व असून इतर पाच ठिकाणी मित्रपक्षांच्या मदतीने अामचीच सत्ता अाहे,’ असेही दानवे म्हणाले. या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांच उत्साह द्विगुणीत झाल्याचेही ते म्हणाले.
मनसेपेक्षा बसपची कामगिरी सरस
राज्यात ४ हजार ७०४ जागांपैकी ७ जागांवर मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या मनसेचे उमेदवार विजयी झाले. मायावती अध्यक्ष असलेल्या बसपचे १७ उमेदवार निवडून आले. राज्यात कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर लढण्याऐवजी स्वबळावर लढण्याला प्राधान्य देणाऱ्या ५७१ उमेदवारांनी विजय प्राप्त केला.