आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणीही यावे, फ्रिजमधून हवे ते खाद्यपदार्थ घ्यावे; तहानभूक भागवावी... तेही माेफत !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - भीक मागणारा लहान मुलगा येतो. फ्रिज उघडतो आणि त्यातील अन्नाचे पाकीट उचलतो. तेथेच उभा राहून खातो.....  परत फ्रिज उघडतो, थंड पाण्याची बाटली काढून अापली तृष्णा भागवताे... घरोघरी कुरियर पोहोचवणारा कुरियर बॉयही भरउन्हातून थकूनभागून येताे अन‌् फ्रिजमधील थंडगार ताक पिताे...  अशा एक ना अनेक गरजू, भुकेल्यांची भूक भागवण्याचे काम मुंबईतील वर्सोवा भागात केले जाते. अनेक गोरगरीब, रोजंदारीवर काम करणारे, हमाली करणारे, कचरा वेचणारे अशा अनेकांच्या पोटाची दोन वेळची भूक माेफत भागवणारा हा अनोखा फ्रिज भुकेल्यांसाठी अन्नपूर्णाच बनला अाहे.   
 
एकीकडे  अन्नधान्याची कमतरता आणि दुसरीकडे वाया जाणारे अन्न असा विराेधाभास अापल्या देशात दिसून येताे. हे अन्न वाया जाण्याऐवजी गोरगरिबांच्या पोटात गेले तर त्याचा सदुपयाेग होईल, असा विचार काही मित्रांनी केला आणि मुंबईतील वर्सोवा येथे कम्युनिटी फ्रिज किंवा ज्याला फूड बँक म्हणता येईल अशी सेवा सुरू केली.   वर्सोवा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट गोपाळ हेगडे यांनी या याेजनेबाबत ‘दिव्य मराठी’ला  सांगितले, आमच्या घरात अनेकदा अन्न शिल्लक राहायचे. ते कामवाली बाईला दिले जायचे. 
 
परंतु हे अन्न रस्त्यावरील गरिबांच्या पोटात का जाऊ नये, असा विचार मी करीत होतो. त्याच वेळेस बंगळुरूमध्ये अशाच प्रकारचे एक चित्र पाहायला मिळाले. तिथे एका हॉटेलवाल्याने त्याच्या हॉटेलमध्ये उरलेले अन्न जनतेला वाटण्यासाठी हॉटेलबाहेरच फ्रिज ठेवला आणि त्यातील अन्न कुणालाही अगदी माेफत नेण्याची व्यवस्था केलेली हाेती, असे माझ्या वाचण्यात अाले.  मग मी विचार केला की आपणही असे का करू नये? माझ्या मित्रांना ही कल्पना सांगितली आणि कम्युनिटी फ्रिज सेवा आम्ही माझ्या वडिलांच्या जयंतीनिमित्त वर्सोवा येथे सुरू केली. आज दिवसभरात १०० पेक्षा जास्त गोरगरीब सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत याचा लाभ घेतात.  
 
असोसिएशनचे सचिव डॉ. क्षितिज मेहता यांनी सांगितले, जागेचा शोध घेत असताना आम्ही ठरवले की गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच मंदिर, मशीद अशा ठिकाणी हा फ्रिज ठेवावा. त्यानुसार आम्ही शंकराच्या देवळाची निवड केली. फ्रिज कसा असावा याचा विचार सुरू केला,  अनेक हॉटेलमालकांचाही सल्ला घेतला. नवा फ्रिज साधारण ५० ते ६० हजार रुपयांना पडत होता. तेव्हा एका हॉटेलवाल्यानेच फ्रिज दुरुस्त करणाऱ्याचा संपर्क करून दिला.

 त्याच्याकडून आम्ही काचा असलेला फ्रिज तयार करून घेतला आणि तो मंदिराच्या बाजूला ठेवला. या ठिकाणी सीसीटीव्हीही असल्याने कोण येते-जाते हे पाहता येते. अाता केवळ अामच्या असाेसिएशनचेच लाेक नव्हे तर वर्सोवा भागातील अनेक लाेकही या फ्रिजमध्ये घरातील उरलेले अन्न अाणून ठेवू लागले अाहेत. इतकेच नव्हे तर काही हॉटेलवालेही त्यांच्याकडे उरलेले अन्न व्यवस्थित पॅक करून या फ्रिजमध्ये ठेवायला देतात अाणि शेकडाे गरजूंची भूक भागवण्याचे पुण्य त्यांना मिळते.  
 
देणाऱ्यांचे हात अनेक  
-वर्षा भागचंदानी केटरर्सचा व्यवसाय करतात. त्या रोज सकाळ-संध्याकाळ ५० जणांचे जेवण फ्रिजमध्ये आणून ठेवतात. ‘मी रोज दोन वेळा डाळ, भात, भाजीची पाकिटे फ्रिजमध्ये आणून ठेवते. याचे पैसे अध्यक्ष गोपाळ हेगडे देतात. अनेकदा सकाळचा नाष्टाही तयार करून देते. लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून फ्रिजमध्ये अन्न ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असेही त्यांनी सांगितले.  
 
- ‘अनेक जण जेवण देऊ शकत नाहीत, मात्र त्याचे पैसे देतात. बिंदू मेहता नावाच्या महिलेने पाच हजार रुपये दिले आहेत. अनेक महिलांनी, संस्थांनीही कम्युनिटी फ्रिजची सेवा सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शवली असून लोखंडवालामध्ये ही सेवा सुरू होईल,’ असे डॉ. क्षितिज मेहता यांनी सांगितले.  
 
-विठ्ठल गोसावी, अच्छेलाल हे दोन तरुण गरजूंना अन्न काढून देतात. ‘सकाळपासूनच भुकेलेल्यांच्या रांगा लागतात. नाष्टा एका तासातच संपतो. तसेच दुपार, रात्रीचे जेवणही लगेचच संपते. अन्न खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वेगळी सेवा केल्याचे समाधान मिळते,’ असेही गोसावी याने सांगितले.  

उन्हाळ्यात मिळते थंड अाइस्क्रीम, ताकही  
वर्साेव्यात अनेक जण वाढदिवस, वा पार्टीत उरलेले अन्न वा ताजे जेवणही या फ्रिजमध्ये आणून ठेवतात. सकाळच्या नाष्ट्याला पुरीभाजी, इडली असे पदार्थ असतात. आता उन्हाळा असल्याने अनेक जण अाइस्क्रीम, दही, ताकही या ठिकाणी आणून ठेवतात. सकाळी साडेसहा ते रात्री ११ वाजेपर्यंत या फ्रिजमधून गरजूंना माेफत अन्न दिले जाते. अन्न आणून ठेवणाऱ्यांची या ठिकाणी एका वहीत नोंदही केली जाते. अन्न देण्यासाठी प्लास्टिकच्या प्लेट, ताट, वाट्याही येथे ठेवलेल्या आहेत.
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...