आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांच्या व्यायामाने गणपती बॉडीबिल्डर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जिममध्ये जाऊन स्वतःच्या सुदृढ आरोग्याकरिता अनेक जण व्यायाम करतात. काही महिने नित्य व्यायामाने डोलेशोले चांगलेच होतात. स्वतःच्या शरीराकडे पाहून आनंद वाटायला लागतो. परंतु तुम्ही भरपूर व्यायाम करताय आणि यामुळे समोरचा गणपती सुदृढ होऊन बॉडीबिल्डरच्या रूपात समोर आला तर? हे काहीसे अशक्य वाटते, परंतु मुंबईत कांदिवली भागात हे शक्य करून दाखवले आहे एका ग्रुपने. जगातील पहिल्या होलोग्राफिक गणपतीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुदृढ आरोग्याचा श्रीगणेशा व्हावा म्हणून हा प्रयत्न आहे. यासाठी प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात ज्या तंत्राचा वापर केला ते तंत्र येथे वापरण्यात आले आहे.
ग्रुपच्या सदस्या आकांक्षा मिश्रा यांनी या अनोख्या संकल्पनेबाबत माहिती देताना सांगितले, कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करताना आपण त्याला "श्रीगणेशा करतो' असे म्हणतो. त्याचाच आधार घेऊन जनतेमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून "आरोग्य श्रीगणेशा' या नावाने आम्ही ही योजना आखली आहे. आज प्रत्येक माणूस सतत धावत असतो. स्वतःकडे लक्ष देण्यास त्याला वेळ नाही. फास्ट फूड, व्यसने यामुळे त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होत आहेत.
मग तब्येत ढासळते आणि त्याचा कामावरही परिणाम होतो. हे सगळे टाळता येणे शक्य आहे फक्त त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. बहुतेक जण गणपतीला मानतात. त्यामुळे आमच्या या मंडपात येऊन प्रत्येकाने आपल्या वाईट सवयी सोडण्याचा संकल्प सोडावा अशी आमची इच्छा आहे. सतत चिप्स खाणे, दारू पिणे, सिगारेट ओढणे यामुळे शरीरावर परिणाम होतो. मात्र, गणपतीसमोर या गोष्टी सोडण्याचा संकल्प केल्यास पुन्हा त्याकडे नागरिक वळणार नाहीत आणि त्यांचे शरीर सुदृढ राहील.
अकराव्या दिवशी पाहा चमत्कार : भाविकांनी कमी केलेल्या कॅलरीजवर खरेखुरे लक्ष ठेवण्यासाठी भक्तांना कॅलरी मीटर दिले जाणार आहेत. भक्तांना आपल्या कॅलरीज गणपतीला दान करावयाच्या आहेत. यासाठी रोज किती कॅलरीज हव्यात याची माहिती बोर्डवर लावली जाणार आहे. अकराव्या दिवशी श्री गणेशाचा एकमेवाद्वितीय, फिट अवतार पाहण्यासाठी भक्तांना अंदाजे ५० हजार कॅलरीज कमी कराव्या लागणार आहेत. यामुळे भक्तांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण होईल अशी आशाही आकांक्षाने व्यक्त केली. यासाठी अनोख्या संकल्पनेसाठी गोल्ड जिम आणि न्यूट्रिलाइटने मदत केली आहे. या अकरा दिवसांमध्ये मंडपामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा, व्यावसायिक झुंबा नृत्य सत्रे, डाएट कँप्स, सकस पाककला कार्यशाळा आणि क्रॉस फिट वर्कआऊट सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.
काय आहे होलोग्राफिक तंत्रज्ञान ?
२००५ मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीने सर्वप्रथम होलोग्राफिक इमेज तयार केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर २०१० मध्ये अॅरिझोना युनिव्हर्सिटीने ३डी होलोग्राफिक इमेज तयार करण्यात यश मिळवले. कोटेड ग्लासच्या मदतीने व्हिडिआे प्रोजेक्शनद्वारा परावर्तित पृष्ठभागाचा वापर करून धुरकट हवेत होलोग्राफिक चित्राचे प्रोजेक्शन संगणकाच्या मदतीने केले जाते. यामध्ये थ्री डायमेन्शनच्या रूपात आपणास हवी तशी प्रतिमा हुबेहूब तयार करता येते. शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती समोर नसतानाही ती समोर असल्याचा भास निर्माण होतो. ज्या व्यक्तीची प्रतिमा निर्माण करायची आहे त्याचे रेकॉर्डंग करून ते लेजरच्या मदतीने धुरकट हवेत हव्या त्या रूपात दाखवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा प्रचाराच्या दरम्यान प्रचारसभांमध्ये भाग घेण्यासाठी याच तंत्राचा वापर केला होता. सलमान खानच्या किक चित्रपटातही एका दृश्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने सलमानची इमेज तयार केल्याचे दाखवण्यात आले होते.
गणपती मंडपातच व्यायामशाळा
या उपक्रमाअंतर्गत गणपती मंडपात एक व्यायामशाळाही उभारण्यात आली आहे. भाविकांना व्यायाम करून प्रत्येक दिवशी गणेशाला त्याच्या कॅलरीज कमी करण्यासाठी मदत करणे, अशी या उपक्रमाची थीम आहे. कॅलरी डोनेशन स्क्रीन (जिथे व्यक्ती आपल्या कॅलरी दान करू शकतो) आणि दानपेटी (जिथे व्यक्ती निकस सवयी टाकू शकतात व सुदृढ आरोग्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेऊ शकतात.) येथे आहे. डाएटिशियन्स, आरोग्य समुपदेशक व आहारतज्ज्ञ मंडपामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि निरोगी जीवनशैलीचा सल्ला देण्यासाठी ११ दिवस असतील.