आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यावर नियमांची अवकळा, वर्षभरात मागणीत २१% घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नोटाबंदी, पॅन कार्डची अनिवार्यता आणि सराफांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभराच्या काळात सोन्याच्या मागणीवर प्रचंड परिणाम झाला आहे. वर्ल्ड गोल्ड काौन्सिलने (डब्ल्यूजीसी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये भारतात सोन्याच्या मागणीत २१ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
 
२०१५ मध्ये भारतात ८५७.२ टन सोने विक्री झाली होती. २०१६ मध्ये ही विक्री थेट ६७५.५ टनांवर आली. दरम्यान, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत २०१६ मध्ये २२.४ टक्क्यांची घट झाली. २०१५ मधील ६६२.३ टनांच्या विक्रीवरून २०१६ मधील विक्री ५१४ टनांवर पोहोचली. किमतीच्या बाबतीत २०१५ मध्ये १, ५८,३१०.४ कोटी रुपयांचे दागिने विकले गेले. २०१६ मध्ये यात  १२.३ टक्क्यांची घट होऊन १,३८,८३७.८ कोटी रुपयांवर हे येऊन ठेपले.
 
डब्ल्यूजीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोमासुंदरम पी. आर. यांच्या मते, २०१६ मध्ये सोन्याच्या मागणीत झपाट्याने घट झाली. सोन्याच्या किमती कमी झाल्याने तसेच दिवाळीचा सण असल्याने २०१६ च्या चौथ्या तिमाहीमध्ये सोनेविक्रीत ३ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली. दरम्यान, सोन्यावर लावण्यात आलेला अबकारी कर आणि त्यास सराफा व्यावसायिकांनी केलेला विरोध, सोने खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय, नोटाबंदी तसेच उत्पन्न घोषित करण्याच्या निर्णयामुळे सोने व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या आव्हानांमुळेच सोन्याची मागणी कमी झाली.
   
जागतिक स्तरावर  मागणी २ टक्क्यांनी वाढली : भारतात सोन्याच्या मागणीत घट झाली असली तर जागतिक स्तरावर मात्र यात २ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. २०१५ मध्ये जागतिक स्तरावर एकूण ४, २१२ टन सोन्याची विक्री झाली होती. ती २०१६ मध्ये ४, ३०९ टनांवर पोहोचली. २०१३ पासून मागील तीन वर्षांतील हा सर्वांत उच्च स्तर आहे.

जागतिक मागणीमध्ये सोन्याच्या एक्सचेंज ट्रेडेड फंडोमध्ये (ईटीएफ) ५३२ टनांची गुंतवणूक तसेच चीनमध्ये चौथ्या तिमाहीत बार कॉइनच्या वाढलेल्या मागणीचा मोठा वाटा राहिला. नोव्हेंबरमध्ये किमतीत आलेली घसरण तसेच चलनाच्या अवमुल्यनामुळे गुंतवणूकीची मागणी ७० टक्क्यांनी वाढून १, ५६१ टनांवर पोहोचली. मागील चार वर्षांतील हा उच्चांक आहे.

२०१७ मध्ये सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता   
सोमासुंदरम यांच्या मते, मागणीत घट होण्याचा परिणाम जास्त काळ दिसणार नाही. जीएसटी लागू झाल्यास आणि मागच्या वर्षी बनवण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी होऊ लागल्यास ही परिस्थिती हळूहळू निवळेल. २०१७ मध्ये ६५० ते ७५० टनांदरम्यान सोने विक्री होऊ शकते.

यामुळे मागण्यांवर परिणाम
- पॅनकार्डची अनिवार्यता, सोन्यावर अबकारी कर.
- नोटबंदी तसेच इन्कम डिस्क्लोजर स्कीमचा प्रचार.
- ग्रामीण भागांतील रोकड संकटामुळे खरेदी घटली.

गुंतवणुकीत १७.१ टक्के घट
गुंतवणुकीची मागणीही १७.१ टक्क्यांनी घटून १६१.५ टनांवर पोहोचली आहे. २०१५ मध्ये ती १९४.९ टन होती. किमतीच्या बाबतीत मागच्या वर्षी ४६,५९७.३ काेटींची असलेली मागणी ४३,६४७.५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

पारदर्शकता येईल
सोन्याच्या मागणीत नियमांमुळे घट आली असली तरी हे नियम सोन्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि पारदर्शक बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. याचा नंतर ग्राहकांनाच फायदा होईल आणि सराफा क्षेत्र अधिकच संघटित होईल, असे मत सोमासुंदरम यांनी व्यक्त केले आहे.