आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत दुचाकीवरील 30 दूत पुरवणार अाराेग्य सुविधा, भाविकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे जमणाऱ्या लाखाे भाविकांच्या अाराेग्य सुविधेसाठी राज्य शासनाने दुचाकीस्वार ३०  अाराेग्य दूतांची नेमणूक केली अाहे. हे आरोग्यदूत भाविक तसेच वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत साहाय्य करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या अाढावा बैठकीत त्यांनी वारीतील आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिका सेवा, आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, पालखी मार्गावरील जलस्रोतांचे शुद्धीकरण याबाबत चर्चा केली.    
 
या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. बी.डी. पवार आदी उपस्थित होते. ३० जून ते ९ जुलै या दहा दिवसांच्या काळात पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांना त्रिस्तरीय आरोग्य सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे शंभर खाटांचे आरोग्य उपकेंद्र येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर ५० खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय देखील कार्यरत आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील १८ धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून वारी काळात २४ तास आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.  
 
३० आरोग्यदूत दुचाकींच्या साहाय्याने भाविकांना आरोग्य सुविधेबाबत साहाय्य करतील. शहरातील पाणी शुद्धीकरण तपासणीबरोबरच आरोग्य केंद्रांची माहितीही ते नागरिकांना देतील. त्याचबरोबर रुग्णवाहिका कोणत्या ठिकाणी आहे याचे मार्गदर्शन करतील, तसेच  गरज भासल्यास दुचाकीवरून रुग्णाला जवळच्या दवाखान्यात देखील रुग्णांना नेतील. फक्त पंढरपूर शहरातच १०२ व १०४ क्रमांक सेवेतील १४ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका प्रसंगी बाह्य उपचार केंद्र म्हणून देखील कार्यरत राहतील. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात संपर्क कक्ष (०२१८६- २२५१०१/ २२५१०३) सुरू करण्यात येणार आहे. 
 
भाविकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा  
संपूर्ण पालखी मार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील (क्रमांक १०८) ७५ रुग्णवाहिका तर दोन मुख्य पालखींसोबत १०८ व १०२ क्रमांक सेवेतील १२ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील सर्व जलस्रोतांची तपासणी करून त्याचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. टँकरमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला असते त्याच्या दोन दिवस आधी त्या भागात डास प्रतिबंधक फवारणी केली जाते. वारी काळात भाविकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...