आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात हजार शिक्षकांची बेकायदा भरती; 67 शिक्षणाधिकाऱ्यांवर ‘फौजदारी’; शिक्षणमंत्र्यांचे अश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘सव्वासात हजार शिक्षकांच्या बेकायदा, अनियमित नेमणुका करणाऱ्या ६७ शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांवर चौकशीअंती फौजदारी कारवाई केली जाईल. बडतर्फी व सेवा निवृत्तिवेतन रोखण्याचीही कारवाई होईल,’ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.  

राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीला पूर्ण बंदी असतानाही ७ हजार २२८ शिक्षकांची बेकायदा नेमणूक झाली. या शिक्षकांच्या वेतनावर ९७ कोटी रुपयांचा खर्च झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिक्षकांवर कारवाई झाली. या शिक्षकांना नोकरी देणारे सरकारी अधिकारी मात्र रग्गड माया जमवून मोकाट सुटले असल्याची तक्रार आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी बेकायदा शिक्षक भरतीकडे लक्षवेधी सूचनेद्वारे लक्ष वेधले. “बेकायदा शिक्षक नेमणूकप्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, अनियमितता झाल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. दीड वर्ष झाल्यानंतरही चौकशी पूर्ण झाली नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर निर्णय नाही. याप्रकरणी शिक्षकांइतकेच शिक्षण अधिकारी दोषी आहेत. कोट्यवधी रुपये ढापून नामानिराळे राहणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार,’ असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर तावडे यांनी शिक्षण अधिकारी दोषी असल्याची कबुली दिली, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाईसंदर्भात कोणतीही नस्ती माझ्याकडे प्रलंबित नसल्याचे सांगितले. ‘सर्व दोषी अधिकाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठीच व्यवस्थित चौकशी केली जात आहे. घाईमध्ये कोणी अधिकारी सुटू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यानंतर संबंधित ६७ अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.’  

भोजनात भ्रष्टाचार?  
पोषण आहार योजनेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सत्यजित पाटील यांनी केला. एकनाथ खडसे, संजय सावकारे यांनीही भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याला उत्तर देताना तावडे यांनी ‘शालेय मध्यान्ह भोजन योजनेची संपूर्ण राज्याची निविदाच साडेअकराशे कोटींची असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो,’ असा प्रतिप्रश्न केला.
बातम्या आणखी आहेत...