आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुळाच्या गुप्तांगावर लोखंडी सळईने मारहाण; इंद्राणी मुखर्जीचा जबाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कैदी मंजुळा शेट्टे हिचा मृत्यू तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाला असून मारहाणीदरम्यान मंजुळाच्या गुप्तांगावर लोखंडी सळईने मारहाण केल्याचा दावा शिना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास आपल्यावरही लैंगिक अत्याचार करण्याची धमकी तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप इंद्राणीने केला आहे. त्यावर तुरुंग प्रशासनाच्या विरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश विशेष सीबीआय न्यायालयाने दिले आहेत.  
  
मंजुळा शेट्टेच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी जबाब देण्यासाठी इंद्राणीला बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी तिने २३ जूनला झालेल्या मंजुळा शेट्टीच्या मारहाण प्रकरणाचा वृत्तांत न्यायालयात कथन केला. ती म्हणाली, ‘शुक्रवारी रात्री जी घटना घडली ती मी कधीच विसरू शकणार नाही. ती रात्र आठवली तरी अंगावर काटा येतो. खरे तर मंजुळा त्यांच्या टार्गेटवरच होती. कारण तुरुंगात तिचे वर्चस्व वाढत होते. कैद्यांमध्ये ती लोकप्रिय होती. हाच राग मनात धरून मंजुळाला अंडी चोरल्याच्या आरोपाखाली मारहाण करण्यात आली. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण तुरुंग हादरला होता. या मारहाणीदरम्यान कित्येकदा तिचे डोके भिंतीवर आदळले. कधी गळ्याला ओढणीने आवळून तिला फरपटले जात होते, तर कधी लोखंडी राॅडने तिला अमानुष मारहाण केली जात होती.’ एवढेच नाही, तर या मारहाणीदरम्यान तिच्या गुप्तांगातही लोखंडी सळई घातली गेल्याचा आरोपही इंद्राणीने या वेळी केला. 

या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी महिला कैद्यांनी तुरुंगात आंदोलन केले. हे आंदोलन दडपण्यासाठी तुरुंगातील सर्व दिवे बंद केले गेले आणि महिला कैद्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरून सर्व महिला कैदी तुरुंगाच्या छतावर गेल्या. यादरम्यान मलाही पोलिसांनी डोक्यावर आणि हातापायांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच घडल्या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास लैंगिक अत्याचार करण्याची धमकीही दिल्याचा आरोप इंद्राणीने केला.   
  
तपास गुन्हे शाखेकडे   
मंजुळा शेट्टेच्या हत्येला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपींना अटक करण्यात नागपाडा पोलिस अपयशी ठरल्याने या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नसून तपासांती जे दोषी ठरतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...