आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपांचा ‘बॉम्ब’: सूर्यकांता चिक्कीची खरेदी खडसेंच्या शिफारशीने-नारायण राणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मी उद्योगमंत्री असताना सूर्यकांता महिला सहकारी संस्थेची चिक्की खरेदी करण्याचा कधीच आग्रह केला नव्हता. उलट तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सूर्यकांताचीच चिक्की खरेदी करावी, अशी २०१२ मध्ये शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. हे शिफारसपत्र आजही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

‘राणे उद्योगमंत्री असताना सूर्यकांताची चिक्की खरेदी करण्याची अट घातली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण विभागाने निविदा न काढता सूर्यकांताची चिक्की खरेदी केली,’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेला आरोप साफ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले. उद्योग विभाग खरेदीच्या वस्तूंचे मूल्य ठरवत असतो. संबंधित विभागाने तीच वस्तू खरेदी करावी असे बंधन नसते. सूर्यकांता महिला सहकारी संस्था माझ्या जिल्ह्यातील जरूर आहे, पण या संस्थेची शिफारस मी कधीच केली नाही, असा खुलासा करत मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरील आरोपांचे पुरावे द्यावे, असे आव्हान राणेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

महिला व बालकल्याण विभागाने चिक्की खरेदी ई निविदा पद्धतीने केली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांना विनाचौकशी क्लीन चिट दिली. असा प्रकार राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला.

राणे यांचे वाग्बाण
- मुख्यमंत्री निव्वळ भाषणबाजी करतात. प्रत्यक्षात त्यांना कोणीही पुसत नसल्याचे चित्र दिसून येते.
- युती सरकारचा कारभार दिशाहीन असून मंत्रालयाचे नाव लवकरच सचिवालय करण्याची वेळ येईल.
- मुंबई ते नागपूर रस्ता करताय पण, विदर्भातल्या किती लोकांची स्वत:च्या वाहनाने मुंबईला येण्याची ऐपत आहे?
- अठरा विधेयके चर्चेविना मंजूर होणे फडणवीस सरकारची हार आहे.
- पावसाळी अधिवेशनात सरकाच्या कारभारची वाभाडे काढणे विरोधक असलेल्या काँग्रेस नेत्यांना जमले नाही.

कर्जमुक्ती ही थट्टा
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती, असे सांगून मुख्यमंत्री शब्दांचे खेळ करत आहेत. शेतकरी आत्महत्यांवर ठोस उपाययोजना न करता राज्याच्या सर्व योजनांमधील कृषीसाठीचा एकत्रित निधी ते कर्जमुक्तीचा म्हणून दाखवत आहेत, असा आरोप राणे यांनी केला.

नाव बदलण्याचा घाट
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलण्याचा घाट भाजप सरकारने घातला अाहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बलिदान दिलेल्या पंतप्रधानाप्रति कृतघ्नपणा आहे, असे राणे म्हणाले.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, एकनाथ खडसे म्हणतात माझ्या सल्ल्याने चालले असते तर राणे पडले नसते...
बातम्या आणखी आहेत...