आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खंबाटा एव्हिएशन’ शिवसेनेला भोवणार, व्यवस्थापनाशी तडजोड केल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अडीच हजार मराठी कामगारांच्या रोजगाराशी संबंधित असलेले “खंबाटा एव्हिएशन’ प्रकरण शिवसेनेला भाेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेच्या नेत्यांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने अडीच हजार कामगार बेरोजगार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट ‘मातोश्री’वर धाव घेतली, तर खंबाटा एव्हिएशनच्या व्यवस्थापनाला कामगारांची थकीत देणी त्वरित देण्याचे आदेश देत मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
    
चाळीस वर्षे जुनी कंपनी असलेल्या खंबाटा एव्हिएशनला अखेरची घरघर लागली आहे. मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचे काम करणाऱ्या या कंपनीच्या २४०० कामगारांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळालेला नाही. गेली दोन वर्षे कामगारांच्या आयुर्विमा आणि पीएफ रकमेचा नियमित भरणाही कंपनीने केलेला नाही. या कंपनीमध्ये भारतीय कामगार सेनेला मान्यता आहे. या प्रकरणी मध्यस्थी करत अंजली दमानिया यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच साकडे घातले आहे. कामगारांना न्याय देऊन भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण महागात पडू शकते, ही बाब लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनीही दमानिया यांच्याशी चर्चा केली. 

सुरुवातीला कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतून दमानिया रागाने निघून गेल्याने त्यानंतर ठाकरे, दमानिया आणि या कंपनीत कामगार सेनेचे काम पाहणारे खासदार विनायक राऊत या तिघांची बैठक घेतली. ती चार तास चालली. दरम्यान, कामगारांच्या मागण्या मुंबई विमानतळ व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या जीव्हीके आणि बर्ड्स एव्हीएशन कंपनीने मान्य केल्याचा दावा ठाकरे यांनी केला अाहे. कामगारांच्या थकीत देण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी खंबाटा एव्हीएशनला अादेश दिल्याबाबत मात्र ठाकरेंनी बाेलण्यास नकार दिला. वस्तुस्थिती काय आहे ते कामगारांना विचारा असे सुचक वक्तव्य त्यांनी केले. तर  बर्डस एव्हिएशन खंबाटाची मालमत्ता ठेऊन घेत, त्या बदल्यात देय असलेली रक्कम शनिवारी देईल, असे दमानिया म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...