आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या ‘सेक्स रॅकेट’वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लातूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या ‘सेक्स रॅकेट’वरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात गुरुवारी विधानसभेत खडाजंगी झाली. महिलांच्या तस्करीमध्ये लातुरातमधील काँग्रेस कार्यकर्तीचा समावेश असल्याचा आरोप भाजपने केला, त्याला काँग्रेसने जोरदार हरकत नोंदवली. अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सरकारला निवेदन करण्याचा आदेश दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला.  
 
राज्यातल्या अठरा जिल्ह्यांमधून तीनशेहून अधिक तरुण मुली, महिलांची तस्करी झाली. याचा केंद्रबिंदू लातुरात आहे. ‘मॅरेज ब्युरो’च्या माध्यमातून महिलांची विक्री करण्यात आली. साठ वर्षांच्या प्रौढाचा विवाह सोळा वर्षांच्या तरुणीबरोबर लावून दिल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला पाहिजे, अशी चर्चा भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी उपस्थित केली. भाजपच्या देवयानी फरांदे, प्रा. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, मंदा म्हात्रे, स्नेहलता कोल्हे, डॉ. भारती लव्हेकर या आमदारांच्या भावना तीव्र होत्या.    
 
लातुरात उघडकीस आलेल्या महिला तस्करी प्रकरणाची सूत्रधार काँग्रेस कार्यकर्ती असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, पीडित मुलींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी या वेळी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपच्या मागणीला पाठिंबा दिला. मात्र, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, अशी विनंती राष्ट्रवादीचे  नेते व माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी सभागृहात केली. त्या वेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आलेल्या मानवी तस्करी प्रकरणाशी भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांचे नाव जोडले गेल्याचा संदर्भ दिला. त्याला भाजपच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर “रूपा गांगुलींचा या प्रकरणाशी संबंध नाही असेच मी म्हणतोय,’ असा खुलासा  अजित पवार पवारांनी केला.   
 
“महिला तस्करीच्या प्रकरणामागचे षडयंत्र उघड व्हायला हवे. मात्र, यातून कोणाला बदनाम करण्याचे प्रयत्न होता कामा नये. कोणाचे, कोणाबरोबर फोटो आहेत यावरून चर्चा होता कामा नये. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोणी कोणाबरोबरही सेल्फी काढून घेते. त्यामुळे जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई व्हावी,’ अशी मागणीही अजित पवार यांनी या वेळी बोलताना केली.  
 
देशमुख-निलंगेकरांमध्ये आरोप- प्रत्यारोप
- लातूर जिल्ह्यातला प्रकार अतिशय गंभीर आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हे रॅकेट चालवले जाते. निश्चितपणे याला राजकीय पाठबळ आहे. पोलिसांमुळे काही गोष्टी आता उघड झाल्या असल्या तरी सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लातूरचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांनी केली. काही वर्षांपूर्वी लातुरात काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी यांची हत्या झाली होती. याचा संदर्भ देत निलंगेकरांनी लातुरातील सेक्स रॅकेटमागे काँग्रेस पदाधिकारी असल्याचे सूचित केले.  
- लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी निलंगेकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ‘लातूरसह राज्यातल्या चौदा जिल्ह्यांंमधले सेक्स रॅकेट उघडकीस येईपर्यंत गृह खात्याचे काय काम चालू होते, असा जाब मी सरकारलाच विचारू इच्छितो. पालकमंत्र्यांच्या नाकाखाली हे उद्योग सुरू असताना ते काय करत होते?’, असा झोंबणारा प्रश्नही त्यांनी विचारला. यावर सरकार गंभीर आहे म्हणूनच पंधरा वर्षांपासून सुरू असलेले उद्योग आता उजेडात आले, असा पलटवार निलंगेकरांनी केला.  
- ‘पक्षाचे नाव घेऊन, दोषारोप करून प्रश्न सुटणार नाहीत. मूळ समस्येला बगल देण्यापेक्षा या मुद्द्यावर सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे,’ असे देशमुखांनी सुनावले. मला यात राजकारण करायचे नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सभागृहाला त्याची माहिती द्यावी, असेही ते म्हणाले.   
- ‘लातूर सेक्स रॅकेटमधील आरोपी महिलेचा काँग्रेसशी दुरायन्वेही संबंध नसल्याचे अमित देशमुखांनी मला सांगितले आहे,’ असे अजित पवारांनीही आवर्जून सांगितले.
बातम्या आणखी आहेत...