आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी चर्चेआधीच विरोधकांचा विधान परिषदेत जोरदार गोंधळ, विरोधकांनी चर्चा टाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या घोषणेनंतरही विधान परिषदेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी बंद पाडण्यात विरोधक यशस्वी झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विरोधकांच्या मागणीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उत्तर देत असताना त्यास हरकत घेऊन विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.  

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आणि शिवसेनेने परिचारकांच्या निलंबनाचा विषय लावून धरल्याने गेले तीन दिवस कामकाज होऊ शकले नाही. गुरुवारी सरकारने परिचारकांच्या तहकुबीचा ठराव मांडल्यानंतर कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा होती. मात्र, विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेतही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला. गुरुवारी दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाले. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. ते म्हणाले, सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्षाने दिला आहे. शेतमालाच्या भावांवर आम्हाला चर्चा करायची आहे. मात्र, कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय सदनात काम करण्याची आम्हाला इच्छा नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी या वेळी मांडली.  
 
विरोधकांनी चर्चा टाळली  
सभापतींनी सरकारची भूमिका मांडण्याची सूचना केल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलण्यास उभे राहिले. मात्र, विरोधकांनी त्यांना बोलू दिले नाही. “शेतकरी आत्महत्यांचा विषय चेष्टेने घेण्याचा नाही. यावर गांभीर्याने, अभ्यासूपणे चर्चा झाली पाहिजे. तुमचे बोलणे ऐकताना मलाही गोंधळ घालता आला असता. पण मी ते केले नाही. आता मला बोलू द्या,’ अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली. मात्र, त्यांच्या भाषणाला हरकत घेऊन विरोधकांनी अडथळे आणणे सुरू ठेवले. या गोंधळातच सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
बातम्या आणखी आहेत...