आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे राजकीयदृष्ट्या सक्रिय होणार का? राज्यभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - महापालिका निवडणुकांमधील पराभव हा आपला शेवटचा पराभव असेल, असा दावा जरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत असले, तरीही कार्यकर्त्यांची उदासीनता पाहता मनसेला राज्याच्या राजकीय पटलावर पुनर्स्थापित  करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कारण राज यांनी यापूर्वी त्यांच्याच काही वक्तव्यांवरून केलेले घूमजाव पाहता, या वेळी तरी पक्षनेतृत्व खरोखरच राजकीयदृष्ट्या सक्रिय होणार का, असा प्रश्न खुद्द मनसे कार्यकर्त्यांनाच पडल्याचे चित्र आहे.    

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत मनसेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. नाशिकसारख्या महापालिकेत तर सत्ता जाऊन मनसेचे अवघे चार नगरसेवक निवडून आले. या पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पक्षाच्या अकराव्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले. हा आपला शेवटचा पराभव असेल, असे जरी राज म्हणत असले, तरीही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह संचारल्याचे दिसत नाही. राज यांच्या भूमिकेबद्दल मनसैनिक अजूनही साशंक असल्याचेच चित्र आहे. कार्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी एखादा राजकीय कार्यक्रम राबवणे आवश्यक असताना, मनसेत मात्र पक्षस्थापनेपासूनच अशा कार्यक्रमाचा कायमच अभाव राहिला आहे. असा एखादा कार्यक्रम राबवण्याची गरज असल्याचे मत अनेक कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत. या शिवाय अनेकदा राज घोषणा करतात, मात्र काही काळानंतर त्यांनाच त्या घोषणेचा विसर पडत असल्याचेही दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा दौरा करण्याची घोषणा राज यांनी केली होती. मात्र, दोन चार जिल्ह्यांना भेटी दिल्यानंतर त्यांनी हा दौरा गुंडाळला होता. महापालिका निवडणुकीपूर्वीही मुंबईतील  शाखांना भेटी देण्याची घोषणा राज यांनी केली होती. मात्र, दादर, माहिम भागातील चार दोन शाखांना भेटी दिल्यानंतर राज यांची ही घोषणाही हवेतच विरली होती. एकूणच राज ठाकरे आपल्या हाती कुठला एजेंटा घेतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.   
 
सहा महिने महत्त्वाचे  
११ व्या वर्धापन दिनाच्या भाषणात राज यांनी आपण आणि पक्षाची नेतेमंडळी कार्यकर्त्यांना भेटायला येणार असल्याची जी घोषणा केली आहे, त्याबाबत कार्यकर्त्यांना खात्री वाटत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धापन दिनाच्या मेळाव्यालाच मनसेच्या अनेक विभाग अध्यक्षांनी दांडी मारली होती. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ झटकण्यासाठी पुढील वर्ष सहा महिने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. या कालावधीत पक्षनेतृत्व खरोखरच राजकीयदृष्ट्या सक्रिय होते का, याकडे सर्वसामान्य मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...