आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेम्स लेनचे कौतुक केल्यामुळेच पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिला का?- राणेंचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारे पुस्तक लिहिणाऱ्या जेम्स लेन यांचे जाहीर कौतुक केले म्हणून राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला की लेनच्या पुस्तकाचे अधिकृत विक्रेते म्हणून त्यांचा सन्मान केला?’ असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सरकारला गुरुवारी केला. दुष्काळाचा मुकाबला करण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी आणि यावरून इतरत्र लक्ष वेधण्यासाठी पुरंदरेंना पुरस्कार देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना त्यावर काही उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने वादग्रस्त असलेले बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देऊन राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचे दुष्काळावरील लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारने हे कारस्थान केले आहे. ‘बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ दिल्यामुळे राज्यातील बहुजन समाज आणि मराठा समाजामध्ये तीव्र संताप पसरला आहे. त्याचे पडसाद जागोजाग उमटत आहेत. हा पुरस्कार देण्यामागे सरकारचा हेतू शुद्ध नाही. तसा असता तर हा वाद निर्माण झाल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराविरोधात भूमिका घेणाऱ्यांना बोलावून चर्चा केली असती. कारण विरोध करणारे कुणी सामान्य माणसे नव्हती. त्यातील अनेक जण साहित्यिक, इतिहास संशोधक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मनातील शंकाचे निरसन सरकारने चर्चेतून करण्याची गरज होती. परंतु ही विचारवंत मंडळी तळमळीने हा पुरस्कार देऊ नका, असे सांगत असताना त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्या नाकावर टिच्चून हा पुरस्कार दिला जातो, या मागे मुख्यमंत्र्यांचा उद्दामपणा आहे. त्यामुळेच लोकांच्या मनातील संताप उसळून वर आला आहे. याची जाणीव सरकारलाही आहे. म्हणूनच हा समारंभ जाहीररीत्या भव्य स्वरूपात आयोजित न करता शे-दीडशे माणसे बसणाऱ्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये घ्यावा लागला,’ अशी टीका त्यांनी केली.
बंदी घातलेल्या पुस्तकाचे विक्रेते
पुरंदरे यांनी जेम्स लेनचे २००३ मध्ये सोलापूर येथे भाषण करताना कौतुक केले होते. इतकेच नव्हे तर ज्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे त्या पुस्तकाचे पुरंदरे अधिकृत विक्रेते आहेत. मुख्यमंत्री म्हणतात पुरंदरेंनी शिवाजी महाराज घराघरांत पोहाेचवले. माझा त्यांना सवाल आहे की, शिवाजी महाराजांमुळे पुरंदरे आहेत, की पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज आहेत?, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.
फडणवीस सरकारचे मारेकऱ्यांना पाठबळ
अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे उलटून गेली. ज्येेष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येलाही सहा महिने पूर्ण झाली. मात्र, अजूनही या दोघांच्याही मारेकऱ्यांना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही. किंबहुना जोपर्यंत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत हे आरोपी पकडले जाणार नाहीत, असे मला वाटते. कारण या मारेकऱ्यांना सरकारचेच पाठबळ आहे, असा अाराेपही राणे यांनी केला.
घाबरत नाही तर पुरस्कार कडक बंदोबस्तात का ?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ‘आम्ही घाबरत नाही’. ‘जर तुम्ही घाबरत नाही, तर मग इतक्या कडक पोलिस बंदोबस्तात पुरस्कार वितरण सोहळा का घेतला? भाजप सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर लाखो लोकांच्या साक्षीने होतो. मग महाराष्ट्राचे भूषण असणारा पुरस्कार एका छोट्या हॉलमध्ये का घेतला जातो?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.