आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र विधान परिषद देशातील पहिले पेपरलेस सभागृह, सदस्यांची डिजिटल वाटचाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेची देशातील पहिलेवहिले पेपरलेस सभागृह बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व सदस्यांच्या बाकांवरील कामकाज पत्राची जागा अत्याधुनिक टचस्क्रीन नाेटबुकने घेतली. सभागृहात येणाऱ्या प्रत्येक सदस्यांना या नाेटबुकबद्दल जितकी अप्रुपता हाेती तितकीच हे पेपरलेस काम अापल्या जमेल की नाही, अशी मनात सुप्त भीतीदेखील हाेती. पण, काहीतरी नवीन बदल घडून विधान परिषद हायटेक हाेत असल्याचा अानंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत हाेता.   

सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेला पाठिंबा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. मी या सभागृहाच्या सभापतिपदी विराजमान झालो, तेव्हा पेपरलेसच्या दिशेने जाण्याचा विचार केला. आज त्या विचाराचे निर्णयात रूपांतर होत आहे. देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान आपल्या सभागृहाला मिळत असल्याबाबत मला विशेष आनंद होत असल्याचे निंबाळकर म्हणाले. या नोटबुकमध्ये इंटरनेटची सुविधा असणार असून विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, नियम पुस्तिका, विधिमंडळाच्या विविध समित्या आणि महामंडळांचे अहवाल, तारांकित आणि अतारांकित प्रश्नांची यादी, स्वीकृत लक्षवेधी सूचना, सदस्यांचे वेतनभत्ते, आजीमाजी सदस्यांची माहिती आणि सभागृहाचे १९३७ सालापासूनच्या कामकाजाचे अभिलेख उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. डिजिटल इंडियामध्ये सहभागी हाेण्यासाठी सर्व सदस्यांनी साथ द्यावी, असे अावाहनही त्यांनी या वेळी केले.   

पेपरलेस व डिजिटल कामकाजाच्या दिशेने विधान परिषदेने वाटचाल सुरू केल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी या वेळी सभापतींचे अभिनंदन आणि कौतुुक केले. याबाबत भाई गिरकर म्हणाले, नव्या बदलाला सामाेरे जाताना त्याचा उपयाेग हाेणे गरजेचे अाहे. त्यामुळे या नव्या प्रणालीच्या अपडेट प्रक्रियेत अाम्हाला सहभागी करून घ्यावे. त्याची पूर्ण माहिती देण्यात यावी. नीलम गाेऱ्हे म्हणाल्या की, तंत्रज्ञानाची अावड असेल तर काम करणे साेपे जाते. परंतु, मधूनमधून ओरडणे थांबवू शकणारा टॅब नाही का? अशी खोचक विचारणाही त्यांनी केली.  

फक्त माझ्याकडे काही फेकू नका   
पेपरलेस सभागृहामुळे सदस्यांची आता मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना यापुढे कागदपत्रे फाडून आपली आक्रमकता दाखविता येणार नाही. मात्र, नोटबुक वगैरे फोडून माझ्यावर टाकू नका म्हणजे झाले, अशी काेपरखळी सभापतींनी या वेळी मारताच सभागृहात जोरदार हशा पिकला.
 
टचस्क्रीन नाेटबुकमुळे सदस्यांची डिजिटल वाटचाल, विधान परिषद सभागृह हायफाय
कागदे भिरकावणार कशी? सभागृहात अाक्रमकता दाखवण्यासाठी कामकाजाशी संबंधित कागदे फाडणे किंवा ती भिरकावण्याची सवय सदस्यांना असते. परंतु कागदांची जागा लॅपटाॅपने घेतल्यामुळे फाडायचे काय अाणि भिरकावायचे काय असा पेच पडल्याचे विराेधी बाकावरील सदस्यांनी बाेलून दाखवले.     
 
खुणा, हातवारे कसे करणार : डिजिटल हाेत अाहाेत हे खरे असले तरी अाता सदस्य नाेटबुकमध्ये अापले डाेके खुपसून असतील. मग एकमेकांकडे पाहणे, खाणाखुणा, हातवारे कसे करणार. त्यामुळे कामकाजातील मजाच निघून जाईल की काय अशी शंका येते असे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...