आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या मोबाइल अ‍ॅपने दोन महिन्यांत टाकली मान; ‘टिवटिवाट’ही बंदच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसेच्या नवव्या वर्धापन दिनाला मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या मनसेच्या मोबाइल अ‍ॅप आणि ट्विटर हँडलने अवघ्या दोनच महिन्यांत मान टाकली आहे. ‘एमएनएस अधिकृत’ या पक्षाच्या मोबाइल अ‍ॅपवर पक्षातल्या घडामोडींची माहिती त्वरित उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता.

एप्रिल महिन्यानंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर मनसेच्या महत्त्वाच्या घडामोडींची कोणतीही माहिती या ‘अ‍ॅप’वर अपडेट केलेली नाही. हे अ‍ॅप बनवणार्‍या खासगी कंपनीने पक्षाकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळल्यामुळेच या अ‍ॅपची हाताळणी बंद करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी या कंपनीला दिल्याची चर्चा सध्या पक्षात जोरदार सुरू आहे.

मनसेच्या वर्धापनदिनी म्हणजे 9 मार्चला मोठा गाजावाजा करत सुरू केलेले ‘एमएनएस अधिकृत’ हे मोबाइल अ‍ॅप सध्या बंद पडले आहे. एखाद्या ज्वलंत मुद्द्यावर पक्षाची भूमिका काय आहे किंवा पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत, याबाबतची माहिती या अ‍ॅपवरून नियमित प्रसारित करण्यात येत होती. तसेच मनसेसंदर्भातल्या ताज्या बातम्या आणि सर्वसामान्य मतदारांच्या काही तक्रारी असल्यास त्या पक्षापर्यंत पोहोचवण्याचे हे अ‍ॅप एक चांगले माध्यम असेल, असा दावा त्या वेळी मनसेच्या वतीने करण्यात आला होता.राज ठाकरेंची भाषणे आणि व्हिडिओसुद्धा या अ‍ॅपच्या माध्यमातून केव्हाही पाहता येतील, असेही सांगण्यात आले होते.

खासगी कंपनीने लूट केल्यामुळे राज ठाकरेंनी दिले ‘बंद’चे आदेश

‘टिवटिवाट’ही बंदच
मनसेचे ट्विटर हँडलही दुर्लक्षितच आहे. एप्रिलअखेरपासून पक्षाच्या वतीने त्यावर काहीही ट्विट केलेले नाही. मनसेचे अ‍ॅप बनवणार्‍या खासगी कंपनीने पक्षाकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळल्याने हे अ‍ॅप हाताळणार्‍या टीमला सुटी देण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच हे अ‍ॅप हाताळणार्‍या टीमपैकी एकाशी संपर्क साधला असता सध्या तांत्रिक बाबींमुळे हे अ‍ॅप आणि ट्विटर हँडल अपडेट झाले नसल्याची माहिती त्याने दिली.

लाखाचे अ‍ॅप कोटीत
इतर पक्षांप्रमाणे मनसेनेही आपले स्वत:चे मोबाइल अ‍ॅप, फेसबुक पेज आणि ट्विटर हँडल सुरू केले होते. अशा पद्धतीने अ‍ॅप बनवण्याचा खर्च फक्त दोन- चार लाखांत असताना हे अ‍ॅप बनवणार्‍या खासगी कंपनीने पक्षाकडून जवळपास दीड कोटी रुपये उकळल्याची माहिती मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

‘31 मे’चे भाषणही अपलोड नाही
मनसेचे अ‍ॅप दररोज अपडेट करण्यासाठी सौरभ करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली एक टीमही कार्यरत होती. मात्र फक्त दीड महिन्यातच ‘अ‍ॅप’ने मान टाकली. अ‍ॅपवर 20 एप्रिलला शेवटची माहिती अपलोड करण्यात आल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर मनसेच्या इतिहासात राज यांच्या ज्या भाषणाची नोंद केली जाईल ते 31 मे रोजी केलेले भाषणही या अ‍ॅपवर अपलोड केलेले नाही. या भाषणात राज यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.