आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरा उपखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रांत नव्या विहिरी नकोत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, निलंगा, देगलूर, किल्लारी या शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्याची आणि लातूर, अंबाजोगाई, औसा या शहरांमधील पाणी गळती कमी करण्याची शिफारस राज्य सरकारने तयार केलेल्या गोदावरी खोऱ्याच्या आराखड्यात करण्यात आली आहे. तसेच मांजरा उपखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रांमध्ये नव्या विहिरी खोदण्यावर बंधन लादण्याची शिफारसही या आराखड्यात करण्यात आली आहे.

गोदावरी खोऱ्यातील मांजरा, तेरणा आणि लेंडी या प्रमुख उपखोऱ्यांमधील नद्यांच्या प्रदूषणाबद्दल या खोऱ्याच्या जलसंपत्ती आराखड्यात खास चिंता व्यक्त करण्यात आली आहे. "तेरणा खोऱ्यात तेरणा नदी ६ ठिकाणी प्रदूषित झाल्याचे निदर्शनास येते. उस्मानाबाद, निलंगा, किल्लारी, ढोकी, तेर, बेंबळी आणि औराद या शहरांचे नागरी आणि औद्योगिक सांडपाणी हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. लेंडी उपखोऱ्यात देगलूर या शहराचे आणि जळकोट या खेड्याचे सांडपाणी लेंडी नदीत सोडण्यात येते. त्यामुळे या नदीचा १५ किमीचा पट्टा प्रदूषित झालेला आढळतो. तसेच मांजरा उपखोऱ्यात मांजरा नदीचा २ किमीचा पट्टा लातूर शहराजवळ प्रदूषित झालेला आढळतो. त्यामुळे या सर्व शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा वापर करणे बंधनकारक ठरविण्यात यावे,' असे या आराखड्यात सूचविण्यात आले आहे.
नव्या विहिरींवर बंधन
मांजरा उपखोरे हे अवर्षणप्रवण आणि तुटीचे खोरे आहे. त्यामुळे या खोऱ्यात सध्या असलेल्या सूक्ष्म सिंचन क्षेत्रात दहापट वाढ करून २०३० पर्यंत १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याची शिफारसही या आराखड्यात करण्यात आली आहे.
लातूरची चिंताजनक गळती
मांजरा उपखोऱ्यातील पाटोदा, केज, रेणापूर, कळंब, शिरूर आणि लातूर यांच्यासह १६ शहरांचा समावेश होतो. यापैकी लातूरला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १२ टक्के, तर लातूर एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील ३५ टक्के पाणी केवळ गळतीमुळे वाया जाते.
तेरणा उपखोरे
या उपखोऱ्याची व्याप्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेड्यापासून लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनीपर्यंत आहे. उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १६ शहरे आणि ३८४ गावांचा समावेश होतो.

मांजरा उपखोरे
या उपखोऱ्याची व्याप्ती बीड जिल्ह्यातील गऊरवाडी ते नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील संगमापर्यंत आहे. या उपखोऱ्यात लातूर, बीड, उस्मानाबाद व अहमदनगर या ४ जिल्ह्यातील १७ तालुक्यातील १६ शहरे आणि ८५० गावांचा समावेश होतो.