आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांकडे पाठ; वाचकांचे ‘लाइक’ ईबुक्सना, अपेक्षेपेक्षा तीस टक्के विक्री कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डोंबिवलीत पार पडलेल्या नव्वदाव्या मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदालनाकडे रसिक वाचकांनी पाठ फिरवल्याने प्रकाशक नाराज असले तरी ईबुक्सना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. पाच प्रतिष्ठित प्रकाशकांनी एकत्र येऊन अँड्राॅइड फोन्ससाठी तयार केलेले मराठी रीडर हे अॅप जवळपास हजार वाचकांनी डाउनलोड केले आहे.

गेल्या चारपाच संमेलनांच्या तुलनेत सर्वात कमी विक्री यंदा झाल्याचे ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे यांनी सांगितले. सासवड, चिपळूण येथे विक्रमी विक्री झाली होती. डोंबिवलीत शुक्रवार व शनिवार फारच कमी लोक स्टाॅल्सकडे फिरकले. जी काही विक्री झाली ती रविवारी, असे ते म्हणाले. डोंबिवलीत संमेलन असल्याने अगदी मुंबईतील नाही तरी ठाण्यापासून बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यातील मराठी वाचक पुस्तकं खरेदीला येतील, अशी अपेक्षा होती, परंतु आमची निराशा झाली, असे परांजपे यांनी सांगितले. परंतु, रोहन, ज्योत्स्ना, मौज, राजहंस व काँटिनेंटल या पाच प्रकाशनांनी एकत्र येऊन निर्माण केलेले मराठी रीडर हे अॅप तीन दिवसांत जवळपास हजार रसिकांनी डाउनलोड केल्याचे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. त्यांच्या स्वतंत्र स्टाॅलवर या अॅपविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. या अॅपवर सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांची संख्या शंभरहून कमी असली तरी हळुहळू वाढवण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. 

आगरी यूथ फोरमने आयोजित केलेल्या या संमेलनात ग्रंथदालन प्रशस्त व बंदिस्त होते, मोकळी जागा भरपूर होती. त्यामुळे शेकडो रसिक एकाच वेळी आले असते तरी ते सहज सामावले असते. परंतु, रविवार संध्याकाळ वगळता तुरळकच माणसं दालनात होती. त्यातही एकच प्रवेशद्वार असल्याने सुरुवातीच्या काही स्टाॅल्सवर जास्त गर्दी होती, बहुतांश रसिक आतल्या स्टाॅल्सपर्यंत पोचलेच नाहीत, असे मॅजेस्टिक प्रकाशनचे आशय कोठावळे यांनी सांगितले. मॅजेस्टिकचा स्टाॅल सुरुवातीलाच होता, तरीही आमच्या अपेक्षेपेक्षा विक्री बरीच कमी झाल्याचे कोठावळे म्हणाले. 
रोहन चंपानेरकर यांनीही अपेक्षेपेक्षा  तीस टक्के तरी विक्री कमी झाली, असे त्यांनी सांगितले. रोहन प्रकाशनचा स्टाॅलही प्रवेशद्वारापासून फार लांब नव्हता.   ग्रंथदालनात आॅडिओ बुक्स, देवनागरी अक्षरं छापलेले टीशर्ट, मराठी स्वाक्षरी, असे वेगळे स्टाॅल्सही होते.
 
पुढील संमेलनासाठी एकही निमंत्रण नाही : श्रीपाद जोशी
पुणे - ‘मराठी साहित्य संमेलनांचा वाढत चाललेला खर्च, हे आगामी संमेलनासाठी अद्याप निमंत्रणे न येण्याचे प्रमुख कारण आहे’, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी सोमवारी रात्री पुण्यात दिली. 

डोंबिवली येथे नुकतेच ९० वे साहित्य संमेलन पार पडले. मात्र दरवर्षी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमातआगामी संमेलनासाठी कोठून निमंत्रणे आली, याची घोषणा केली जाते. यंदा डोंबिवली संमेलनाचे सूप वाजत असताना रविवारी खुल्या अधिवेशनात आगामी ९१ व्या संमेलनाच्या निमंत्रणांविषयी मौन पाळण्यात आले. त्यामुळे जोशी यांना याविषयी विचारणा केल्यावर अद्याप तरी एकही निमंत्रण महामंडळाकडे आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  एकदा या संमेलनाची धूळ खाली बसल्यावर आगामी संमेलनाबाबतच्या निमंत्रणाविषयीची मुदत निश्चित केली जाईल, असे जोशी म्हणाले.

‘संमेलनांचा वाढता खर्च हेच निमंत्रण न येण्याचे महत्त्वाचे कारण असावे. शासनाचे अनुदान एक कोटी रुपये होत नाही तोवर संमेलन भरवू इच्छिणाऱ्या मंडळींना दिलासा मिळणे अवघड आहे. गेली अनेक वर्षे शासन २५ लाख रुपयांचे अनुदान देते. त्यात आता भरीव वाढ अपेक्षित आहे. शिवाय नोटाबंदी आणि ठिकठिकाणच्या निवडणुका, हेही निमंत्रण न येण्याचे कारण असू शकेल. आपण आपल्या सवयी थोड्या बदलून, थोडासा त्रास सहन करून संमेलनांना जात नाही तोवर संमेलनांचा खर्च कमी होण्याची शक्यता नाही’, असेही जोशी म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...