आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिगामी लोकांपेक्षा पुरोगामी लोकांची सोयीची असहिष्णुता घातक : कवठेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)- समाजातील प्रतिगामी लोकांपेक्षा पुरोगामी उदारमतवादी लोकांची सोयीची असहिष्णुता ही समाजाला अधिक घातक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी शनिवारी  केले. "पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता' या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
  
कवठेकर म्हणाले, १९९० च्या दशकापासून महाराष्ट्रातील असहिष्णुता अधिक तीव्र झाली. मंडल आयोग लागू झाला. बाबरी मशीद पाडण्यात आली. या दोन घटनांमुळे महाराष्ट्रासह देशातील असहिष्णुता वाढण्यास मदत झाली, हे नाकारता येणार नाही. आपल्याशिवाय दुसऱ्यालाही काही मत असते, हे मान्य करायला आपल्या समाजातील लोक सहजासहजी तयार होत नाहीत. एखाद्याने मत मांडले की त्यावर त्याचा वैचारिक प्रतिवाद न करता ते हिंसक कृतीतून त्याला विरोध करतात. 

महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांत कोणताही वैचारिक वाद खेळला गेलेला नाही याचे कारण वाढलेली कमालीची असहिष्णुता आहे, असेही ते म्हणाले. या परिसंवादात बोलताना कवयित्री नीरजा म्हणाल्या, महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो. नवीन विचार करणारे लोक म्हणजे ते पुरोगामी. महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचे युग अवतरल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाचे अध्यक्षीय भाषण अधिक समाजस्पर्शी हवे; परिसंवादात चर्चा
९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण अलीकडच्या काळातले साहित्यकेंद्री मूलगामी विचार असले तरीही ते अधिक समाजस्पर्शी हवे होते, असे मत शनिवारी या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
   
हे भाषण जुन्या मळवाटेने जाणारे नव्हते, त्यात नेहमी असतो तसा आढावा नव्हता तर ते प्रांजळ, वस्तुनिष्ठ व मेंदूला आवाहन करणारे होते, असे प्रा. अनिल नितनवरे म्हणाले. डॉ. काळे यांनी ऐतिहासिक व पौराणिक कादंबऱ्या यांनाच साहित्य समजणऱ्या लोकांना हे दाखवायचं धाडस केलं की इतिहासाच्या आधारावर लिहिणे आता थांबवायला हवे व समकाळाशी एकरूप होऊन लिहायला हवे, असे पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितले.  हे भाषण १९८० ते २०३७ यापैकी कधीही होऊ शकते, इतके व्यापक होते, परंतु त्यात आजच्या लेखक कलाकृतींवर काहीही भाष्य नाही, असेही ते म्हणाले. 

ज्येष्ठ संपादक व लेखक भानू काळे यांनी या वेळी मराठी साहित्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. स्वयंप्रकाशित साहित्य, दुर्लक्ष केले गेलेले मुद्रितशोधन, अर्थकारणाचा साहित्यावरचा परिणाम यावर चर्चा होत नाही. ललित लेखन कमी झाले आहे, कथा कमी लिहिल्या जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साहित्य आपल्याला नेमकं कशाला हवं असतं, त्याचं उत्तर भाषांतून मिळायला हवे, असे ते म्हणाले. 
  
डॉ. काळे यांनी वाचकांनी आपली इयत्ता वाढवायला हवी, असे म्हटल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणारा मध्यमवर्गच मराठीला तुच्छतापूर्वक वागवतो, असेही त्यांनी म्हणणे महत्त्वाचे होते, असेही मत या वेळी व्यक्त करण्यात आले. 

दरम्यान, या परिसंवादाला राज्यभरातून आलेल्या साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती होती. एकूणच संमेलनाच्या आयोजनाबाबत साहित्यिक व रसिकांनी दाद दिली  आहे.
 
अंमलबजावणी, नियोजन  आणि पैशाची योग्य सांगड घातल्यास उद्योग यशस्वी 
नियोजन, अंमलबजावणी, पैसा आणि आपला चमू यांची सुयोग्य सांगड घातली की व्यवसायातील कोणत्याही गोष्टी सहजसोप्या होतात. पण त्यात नियोजन ही व्यवसायाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे, असे ज्येष्ठ उद्योजक जयंत म्हैसकर यांनी सांगितले. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी वृत्तनिवेदक अरविंद विंझे आणि शैलेश पेठे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत म्हैसकर यांनी त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास सर्वांसमोर उलगडला. 
 
म्हैसकर म्हणाले, शाळा ही कुटुंबासारखी असते. या कुटुंबात जे काही शिकायला मिळते, त्यावरच आपले भविष्य अवलंबून असते. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायला हवे. व्यवसायाचे बाळकडू वडिलांकडून मिळाल्याचे ते म्हणाले. व्यवसाय करायचा हे ठरलेले होते तरी कोणता व्यवसाय करायचा हे निश्चित नव्हते. वडिलांकडून ५० हजारांचे भांडवल घेऊन व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय केला. त्यात नफा कमावत वडिलांचे भांडवल परत केले. २००२ मध्ये एमईपी इन्फ्राची स्थापना केली. कर्ज मिळवताना अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते बांधणी व देखभाल ही नवी संकल्पना असल्याने थोडा त्रास झाला; पण योग्य सादरीकरण करता आले तर यश मिळते, असेही म्हैसकर यांनी या वेळी बोलताना सांगितले.

डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर : जयंत म्हैसकर  
पायाभूत क्षेत्रात सरकारची कंत्राटे मिळवताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे सूत्र वापरल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. थंड डोक्याने एखादी गोष्ट पटवून दिली की ती राज्यकर्त्यांना पटते हे कळल्याचेही ते म्हणाले. व्यवसाय करताना टीमवर्क अत्यंत गरजेचे आहे.

मुलांना हवे ते बालसाहित्य द्या : डॉक्टर न. म. जोशी
लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तू दिल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांना आवडणारे बालसाहित्य देण्याची गरज आहे. मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते, फक्त त्याला योग्य दिशा मिळण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन  बालकुमार मेळावा परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर न. म. जोशी यांनी शनिवारी केले.
  
९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पु. भा. भावे साहित्यनगरीतील शं. ना. नवरे सभामंडपात पार पडलेल्या बालकुमार मेळाव्याच्या व्यासपीठावर बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले? या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. एकनाथ आव्हाड, नरेंद्र लांजेवार, डॉ. सुरेश सावंत या वेळी उपस्थित होते. बालसाहित्यामुळे कल्पनेचे पंख मिळतात तशीच विनोदबुद्धीही मिळते. आत्मभान जागे होते, पण बालसाहित्याची  पाहिजे तेवढी चर्चा होत नाही,  किंबहुना ते उपेक्षित असल्याबद्दल सुरेश सावंत यांनी खंत व्यक्त केली.  
बालकांचे कार्यक्षेत्र संगणकाचा पडदा आहे. 

टीव्ही आणि संगणक यांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारा होत आहे. त्यामुळे बालक यंत्र होत आहेत आणि हे थांबण्यासाठीच उत्तम बालसाहित्याची गरज आहे, असे ते म्हणाले. एकनाथ आव्हाड म्हणाले, बालसाहित्यात महत्त्वाचं म्हणजे बालमनाचं गुणधर्म असलेलं साहित्य टिकतं; पण हे चैतन्य कुठेतरी घुसमटत आहे.  गुणात्मक साहित्य कमी आहे. मुलांना नावीन्याची गरज आहे. किशोर गटातील मुलांना कुमार गटातील साहित्य दिलं जातं. मुलाच्या मानसिक, बौद्धिक विचारांचं साहित्य दिलं पाहिजे.   

नवे प्रयोग हवेत  
बालसाहित्याला समीक्षकांनी आणि प्रसारमाध्यमांनी उचलून धरलं नाही. बालसाहित्यात नवे प्रयोग व्हायला पाहिजेत. आजच्या चौकोनी कुटुंबात आजी-आजोबा दूर आहेत. यासाठी नवीन साहित्याची गरज आहे. आजचे बालसाहित्यिक आपले अनुभव जाणून साहित्य तयार करतात. अजून लिहिणारे हात वाढले पाहिजेत. बालसाहित्याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे आणि ही मोठी जोखीम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

“साहित्य,  माध्यमांचे उत्तरदायित्व’वरील परिसंवाद रंगला
“साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व’ या विषयावरील परिसंवाद चांगला रंगला. प्रसिद्धी माध्यमे, खासकरून टीव्ही - साहित्याकडे दुर्लक्ष करतात, अनेक वृत्तपत्रांनी आज संमेलन अध्यक्षांच्या भाषणाची मुख्य बातमीही केली नाही, अशी टीका या वेळी परिसंवादाचे समन्वयक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी केली व त्याला पत्रकार संजय आवटे यांनी सडेतोड उत्तर दिले. साहित्यिक नक्की काय करत आहेत, त्यांना जागतिक भान आहे का, साहित्याच्या नावाखाली काहीही प्रसिद्ध होतंय, त्याकडे पाहायला हवे, असा प्रतिवाद केला. काव्यसंग्रह कोणी प्रकाशित करायला तयार नसते, विकायला तयार नसते, ते अधिक गंभीर आहे, असे ते म्हणाले. 

जातीय अस्मिता तीव्र : कवयित्री नीरजा  
महाराष्ट्रात साहित्यिकांवर अश्लील लिखाण केले,  असा आरोप करून खटले भरण्यात येऊ लागले. नाटके बंद पाडण्यात येऊ लागली. आता जातीय अस्मिता तीव्र होऊन एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा महाराष्ट्र पूर्वीच कधीच नव्हता, असेही कवयित्री नीरजा यांनी सांगितले. देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करण्यात भांडवलशाही व उजव्या विचारसरणीच्या लोकांचा मोठा हात आहे, असेही नीरजा यांनी या वेळी बोलताना सांगितले.
 
 
बातम्या आणखी आहेत...