आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: मराठीच्या क्षितिजावर "रंगवाचा’, "आविष्कार प्ले स्टोअर’; पहिल्या अंकाची किंमत केवळ पाच रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी रंगभूमीला वाईट दिवस आले आहेत, मराठी नियतकालिकांना घरघर लागल्याची चर्चा एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूस रंगभूमीविषयक घडामोडीला वाहिलेल्या दोन नव्या मराठी नियतकालिकांचा अलीकडेच उदय झाला आहे. मुंबईतील अाविष्कार या नाट्यसंस्थेच्या वतीने “आविष्कार प्ले स्टोअर’ व कोकणातल्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने “रंगवाचा’ ही नवी त्रैमासिके प्रसिद्ध करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नाट्यविषयक घडामोडींच्या विश्लेषणासाठी रंगकर्मी व प्रेक्षकांना दोन नवी हक्काची लेखन व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत.  
 
“अाविष्कार’ संस्थेने जून महिन्यात आपल्या “आविष्कार प्ले स्टोअर’ या नव्या त्रैमासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्याची किंमत अवघी पाच रुपये आहे. याबाबत नाट्यसंस्थेचे अरुण काकडे म्हणाले, अाविष्कार सांस्कृतिक केंद्राचे आविष्कार प्ले स्टोअर त्रैमासिक हे नवे रूप आहे. अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी अाविष्कार प्लेस्टोअरचा पहिला अंक प्रसिद्ध करण्यात आला. नाट्यविषयक माहिती, घडामोडी, नाटकाच्या विविध अंगांची चर्चा देणाऱ्या मासिक/त्रैमासिकांची एक मोठी परंपरा आपल्याकडे होती परंतु दुर्दैवाने सध्या लोप पावत चालली आहे. त्या परंपरा पुन्हा उज्ज्वल स्वरूपात पुढे यावी यासाठी `आविष्कार’ने आविष्कार प्ले स्टोअर हे नवे त्रैमासिक सुरू केले आहे.   

कोकणातील कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने “रंगवाचा’ या त्रैमासिकाचा पहिला अंक फेब्रुवारीमध्ये व त्यानंतर दुसरा अंक मे महिन्यात प्रसिद्ध झाला. आता तिसऱ्या अंकाच्या मजकुराची जुळवाजुळव सुरू आहे. “रंगवाचा’ त्रैमासिकाबाबत संपादक वामन पंडित म्हणाले, गेली चार दशके मराठी रंगभूमीसंबंधात वैयक्तिक व संस्थात्मक काम करताना दस्तऐवजीकरणाचा अभाव सतत अस्वस्थ करत राहिला. नुसती अस्वस्थता बाळगून राहण्यापेक्षा आपल्या परीने काही काम सुरू करावे ही रंगवाचा नियतकालिक प्रकाशित करण्यामागची मूळ प्रेरणा आहे.